Shubman gill wearing black socks: लीड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दमदार सामना पाहायला मिळत आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल सामन्याआधीपासूनच खूप चर्चेत आहे. त्याने एक दमदार शतकही ठोकलं. पण भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शनिवारी एक वेगळाच मुद्दा चर्चेचा विषय ठरला. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल, ज्याने शतकी खेळी करून चाहत्यांची वाहवा मिळवली, तो आता ICC च्या नियमांमुळे अडचणीत आला आहे. कारण काय तर गिलने सामन्यादरम्यान काळ्या रंगाचे मोजे घातले होते.
शुभमन गिलने दमदार शतकी खेळी करत 147 धावा केल्या. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची विकेट गेली. त्याच्या खेळाचं कौतुक सुरू असतानाच सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल झाला. या व्हायरल फोटोमध्ये तो काळ्या मोज्यांमध्ये दिसत होता. या फोटो नंतर आयसीसी (ICC) च्या नियमांची चर्चा होण्यास सुरुवात झाली.
आयसीसी (ICC) च्या ड्रेस कोड आणि इक्विपमेंट नियमांमध्ये ‘रुल 19.45’ स्पष्ट सांगतो की, टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूंनी केवळ पांढऱ्या, क्रीम किंवा हलक्या राखाडी रंगाचे मोजे घालावे. काळे, रंगीत किंवा उठावदार मोजे घालणं नियमबाह्य मानलं जातं. त्यामुळे गिलने हा नियम तोडला असं मानलं जाऊ शकतं.
या नियमाच्या उल्लंघनावर ‘लेव्हल-1’ गुन्हा लागू होतो, ज्याअंतर्गत खेळाडूच्या सामन्याच्या फीचं 0 ते 50 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मात्र ही कारवाई पूर्णतः मॅच रेफरीच्या निर्णयावर अवलंबून असते. या सामन्यात मॅच रेफरी रिची रिचर्डसन आहेत. आता गिलवर दंड होतो की विषय थंड होतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
गिलने केवळ फलंदाजीत नव्हे तर नेतृत्वातही चमक दाखवली. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने पहिल्या डावात 471 धावांचा डोंगर उभा केला आहे.