WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकाचा संघ मागील अनेक काळापासून जागतिक क्रिकेटमधील सर्वात खतरनाक संघांपैकी एक मानला जातो. या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जॅक कॅलिस, जोंटी रोड्स, एबी डिविलियर्स सारखे अनेक दिग्गज खेळाडू दिला आहेत. परंतु दक्षिण आफ्रिका संघाला बऱ्याचदा 'चोकर्स' म्हणून हिणवलं जातं. मात्र या संघाला 'चोकर्स' का म्हटलं जातं, यामागचं नेमकं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघापैकी एक आहे. मात्र बऱ्याचदा महत्वाच्या स्पर्धांमध्ये फायनलला आल्यावर हा संघ विजेतेपद मिळण्यात अपयशी ठरतो. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत केवळ एक आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. 1998 मध्ये साऊथ आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं, त्यानंतर बऱ्याचदा हा संघ आयसीसी स्पर्धांच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचला, पण त्यांना विजेतेपद जिंकता आले नाही.
वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने बऱ्याचदा फायनल आणि सेमी फायनलपर्यंत मजल मारली. पण त्यांना विजेतेपद जिंकण्यात यश आले नाही. मागच्या वर्षीची गोष्ट पाहिली तर वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभव मिळाला. याच्या आधी वर्ल्ड कप 2023 मध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
दक्षिण आफ्रिका संघाचं नशीब अनेकदा खराब राहिलंय. दक्षिण आफ्रिका 1992, 1999, 2015 आणि 2023 वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झाले. दक्षिण आफ्रिका 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सुद्धा पोहोचली होती, मात्र न्यूझीलंडने त्यांना 50 धावांनी पराभूत केलं. मात्र यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकून दक्षिण आफ्रिका त्यांचा चोकर्स हा टॅग पुसून टाकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.