Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. चौथ्या कसोटीत रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने हार टाळत सामना बरोबरीत राखला गेला. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते शेवटच्या कसोटी सामन्याकडे. याशिवाय विशेषतः जसप्रीत बुमराहच्या सहभागाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 31 जुलै रोजी ओव्हल मैदानावर ही निर्णायक कसोटी खेळवली जाणार असून, भारताला मालिका बरोबरीत संपवायची असेल तर ही लढत जिंकणे अत्यावश्यक आहे.
चौथ्या कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुमराहच्या मैदानात उतरायच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. गौतम गंभीर म्हणाला, "आतापर्यंत कोणत्याही खेळाडूबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. बुमराह खेळेल की नाही हे ठरवले गेलेले नाही. मात्र, जे खेळाडू मैदानात उतरतील, ते देशासाठी आपले शंभर टक्के देतील."
गंभीरने पुढे सांगितले की, "भारतीय संघातील सर्व जलदगती गोलंदाज सध्या पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. कोणताही वेगवान गोलंदाज सध्या दुखापतीमुळे बाहेर नाही."
भारतासाठी ही अंतिम कसोटी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बुमराहला विश्रांती दिली जाणार का, की तो निर्णायक सामन्यासाठी मैदानात उतरेल याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. प्रशिक्षकांच्या सूचनांनुसार, निर्णय अंतिम क्षणी घेण्यात येणार आहे.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी काळात कसोटी क्रिकेटपासून दूर जाऊ शकतो का? अशा चर्चांना आता अधिक बळ मिळालं आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी बुमराहच्या कसोटी भवितव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कैफ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "जसजसे रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांसारखे खेळाडू कसोटी क्रिकेटपासून बाजूला झाले आहेत, तसंच पुढचं नाव बुमराहचंही असू शकतं. मला आशा आहे की तसं होणार नाही, पण त्याच्या खेळात ती सहजता आता दिसत नाही. त्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याचं शरीर थकलेलं जाणवतं."
चौथ्या कसोटीत बुमराहने 28 षटकांत केवळ 1 विकेट घेतली होती. त्याची धारही काहीशी कमी झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. यामुळेच कैफ यांचा अंदाज अजून ठोस वाटतोय. भारतीय संघासाठी बुमराहचा अनुभव आणि धारदार मारा महत्त्वाचा आहे, पण सततचा ताण, दुखापती आणि शरीरावरचा परिणाम यामुळे तो कसोटी क्रिकेटपासून लांब राहत नाही ना, अशी शंका आता क्रिकेट वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.