Will Gill be the captain of the World Cup 2027?: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आधीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि अलीकडेच त्यांनी कसोटी क्रिकेटलाही अलविदा केलं. सध्या ते केवळ वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहेत. मात्र, आगामी 2027 विश्वचषक दोघांच्याही करिअरमधील शेवटचा मोठा स्पर्धा ठरू शकतो, असं मानलं जात आहे. गौतम गंभीर सध्या भारतीय संघाच्या नव्या तयारीत व्यस्त आहेत. नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात येत असल्याने, आगामी काळात रोहित आणि विराट यांना संघात स्थान मिळवणं अवघड जाऊ शकतं. अशातच भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याच्या एका विधानामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.
मोहम्मद कैफने आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की, “रोहित शर्मा कदाचित 2027 चा वर्ल्ड कप खेळणार नाही. त्याचप्रमाणे तो त्या वेळी भारताचा कर्णधारही नसेल.” कैफच्या मते, पुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताचा नेतृत्वभार शुभमन गिलकडे देण्यात येऊ शकतो. जर रोहितने आगामी वनडे सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी केली नाही, तर त्याला अंतिम संघातून वगळण्यातही येऊ शकतं.
शुभमन गिलने अलीकडील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संयमित आणि परिपक्व खेळ दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मोहम्मद कैफ म्हणतो, “गिल केवळ उत्कृष्ट फलंदाजच नाही, तर त्याच्यात नेतृत्वगुणही आहेत. त्याचा वनडे क्रिकेटमधला रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडे व्हाइट बॉल क्रिकेटची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.”
भारतीय संघात सध्या अनेक तरुण आणि प्रतिभावान खेळाडू समाविष्ट होत आहेत. यशस्वी जायसवाल, केएल राहुल, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंमुळे टॉप ऑर्डरमध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करावी लागणार आहे.