Rohit Sharma to be sacked from ODI: भारतीय सलामीवीर रोहित शर्माने नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने T-20 क्रिकेटला आधीच निरोप दिला आहे. रोहित अजूनही एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे आणि अलिकडेच भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. पण आता त्याच्याबद्दल एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही काढून टाकले जाऊ शकते आणि त्याच्या जागी तरुण सलामीवीर शुभमन गिलला कर्णधारपद दिले जाऊ शकते. शुभमन गिलच्या कसोटीतील यशस्वी नेतृत्वानंतर आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तोच भारताचा पुढचा वनडे कर्णधार होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. काही पत्रकारांनी थेट असा दावा केल्यामुळे गिल आणि रोहित शर्मा ही जोडी ट्विटर (X) आणि इन्स्टाग्रामवर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.
'स्पोर्ट्स तक’ च्या माहितीनुसार, शुभमन गिलचं 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व करणं निश्चित आहे. रोहित शर्मा किती काळ संघात राहील, यावर मात्र स्पष्टता नाही. काही रिपोर्ट्स तर म्हणतात की ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या तीन वनडे सामन्यांमध्ये गिलचंच नेतृत्व असेल.
या सगळ्याची सुरुवात डिसेंबर 2024 मध्ये झाली होती, जेव्हा रोहित शर्माने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाचव्या कसोटीतून स्वतःला बाजूला घेतलं होतं. त्यानंतर तो पुन्हा कसोटी कर्णधार म्हणून दिसलाच नाही. हीच त्याची शेवटची कसोटी होती. त्याने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचं नेतृत्व केलं आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ODI आणि कसोटीसाठी स्वतःला उपलब्ध ठेवलं. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच बातम्या आल्या की BCCI ने त्याच्याकडून कसोटी कर्णधारपद काढून घेतलं आहे. काही दिवसांतच रोहितने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली.
हे ही वाचा: W, W, W, W, W, W... 6 चेंडूत 6 विकेट्सचा चमत्कार! 'या' संघाच्या गोलंदाजांनी पसरवली दहशत
रोहित आता 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी फिट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. 2023 मध्ये अहमदाबादच्या अंतिम सामन्यात भारताला मिळालेल्या हारीनंतर रोहितला अजून एक संधी हवी आहे. त्याचा जुना साथीदार विराट कोहलीदेखील कसोटी आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्त झाला आहे, पण त्यानेही 2027 वर्ल्ड कपचं लक्ष्य ठेवलेलं आहे.
भारताचा ऑगस्ट महिन्यातील बांग्लादेश दौरा सध्या स्थगित झाला आहे, त्यामुळे दोघांच्याही पुनरागमनावर परिणाम झाला आहे. आता चर्चा सुरू आहे की त्याच खिडकीत श्रीलंका दौरा आयोजित केला जाऊ शकतो. पण यावर अजून अधिकृत घोषणा नाही.
हे ही वाचा: Asia Cup 2025 रद्द होणार? भारत आणि श्रीलंकेच्या 'या' निर्णयाने उडाली खळबळ
गिलने आधी वनडे फॉर्मॅटमध्ये आपली छाप पाडली होती. 2023 आणि 2024 मध्ये ओपनर म्हणून त्याची कामगिरी जबरदस्त होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघाचं नेतृत्व करताना त्याने उत्तम रणनीती, संवाद आणि संयम दाखवला. वनडे कर्णधारपदासाठी एक पर्याय श्रेयस अय्यरही आहे, जो चौथ्या क्रमांकावर स्थिर आहे आणि IPL मध्ये यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्याची कॅप्टन म्हणूनही मजबूत ओळख आहे.
हे ही वाचा: iPhone, पैसे आणि फसवणूक? यश दयालने शेवटी मौन सोडलं, यौन शोषणाच्या आरोपावर दिलं स्पष्ट उत्तर
आता सगळ्यांच्या नजरा ऑक्टोबर महिन्यावर लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोण कर्णधार असेल, यावर भारताच्या आगामी दिशा ठरणार आहे. रोहितच्या अनुभवाला गमावणं कठीण असेल, पण गिलसारखा तरुण आणि आत्मविश्वासू खेळाडू पुढे येणं हे भारतीय क्रिकेटसाठी एक नवा अध्याय ठरू शकतो.