कार्डिफ : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ रनने पराभव केला. या मॅचमध्ये बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरी केली. पहिले बॅटिंग करताना स्टोक्सने ७९ बॉलमध्ये ८९ रन केले. तर नंतर बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेच्या २ विकेट घेतल्या. याचबरोबर स्टोक्सने दोन कॅच पकडले आणि १ रन आऊट केला.
बेन स्टोक्सने या मॅचमध्ये घेतलेल्या अफलातून कॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३१२ रनचे तगडे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३४ ओव्हरनंतर १८०/६ अशी होती. ३५ व्या ओव्हरमध्ये आदिल रशीद बॉलिंग टाकायला आला. त्याच्या पहिल्याच बॉलवर अँडिले पेहलूकवायोने मिडविकेटच्या दिशेने स्वीप शॉट मारला.
यावेळी बेन स्टोक्स डिप मिडविकेट जवळ होता. स्टोक्सने उलट्या दिशेने उडी मारली आणि अशक्य वाटणारा कॅच एकहाताने पकडला. त्यामुळे बॅट्समन पेहलूकवायो देखील पाहतच राहिला. स्टोक्सच्या या अफलातून कॅचचे त्याच्या सहकाऱ्यांनी आणि मैदानातील समर्थकांनी कौतुक केले. दरम्यान आयसीसीने या कॅचचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे.
Have you EVER seen a better catch?
— ICC (@ICC) May 30, 2019
Ben Stokes with a grab that has to be seen to be believed!#WeAreEngland #CWC19 pic.twitter.com/rpN04OxVTk
इंग्लंडच्या विजयात मोलाचं योगदान दिल्यामुळे बेन स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. इंग्लंडची या वर्ल्ड कपमधील पुढची मॅच ३ जूनला पाकिस्तानविररुद्ध होणार आहे.