Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : 'एबीची पुनरागमनची मागणी फेटाळल्याबद्दल खेद नाही'

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने एका वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

World Cup 2019 : 'एबीची पुनरागमनची मागणी फेटाळल्याबद्दल खेद नाही'

जोहान्सबर्ग :  दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने एका वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये पुनरागमनासाठी एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव ठेवला होता. एबीचा हा प्रस्ताव दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने फेटाळून लावला. या सगळ्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या सगळ्या प्रकरणावर दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे प्रमुख लिंडा झोंडी म्हणाले, '२०१८ साली मी एबी डिव्हिलियर्सला निवृत्त न होण्याची विनंती केली होती. एबी कधी खेळायचं हे स्वत: ठरवत होता, असा समज अनेकांचा झाला, पण हे सत्य नव्हतं. वर्ल्ड कपसाठी ताजेतवाने राहण्यासाठी योजना बनवायलाही मी त्याला सांगितलं होतं.'

'वर्ल्ड कप टीम निवडीसाठी पात्र व्हायचं असेल तर, घरच्या मैदानात श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध खेळावं लागेल, असं आम्ही एबीला आधीच सांगितलं होतं. पण त्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये टी-२० लीग खेळण्यासाठी तो गेला. आमची ऑफर एबीने फेटाळून लावली, आणि निवृत्तीचा निर्णय योग्य असल्याचं तो म्हणाला.', असं झोंडींनी सांगितलं.

'कर्णधार फॅफ डुप्लेसिस आणि प्रशिक्षक ओटिस गिबसन यांनी एबीला टीममध्ये पुनरागमन करायचं आहे, असं वर्ल्ड कपसाठीची टीम निवड करण्याच्या दिवशीच १८ एप्रिलला सांगितलं. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. एबी डिव्हिलियर्समुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरण्यासाठी आम्हाला वर्षभर फ्रॅन्चायजीमधले खेळाडू शोधावे लागले. खेळाडूंनी घेतलेल्या कठोर परिश्रमांमुळे त्यांना संधी देणं गरजेचं होतं. हा निर्णय सिद्धांतावरचा होता. टीम, खेळाडू, निवड समिती आणि फ्रॅन्चायजीसाठी न्याय करणं महत्त्वाचं होतं', असं झोंडी म्हणाले.

'वर्षभरामध्ये एबीने निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध केलं नाही. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीची टीम निवड करताना ही बातमी आली, तरी आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. वर्ल्ड कपसाठीची आमची टीम निश्चित झाली होती. एबी डिव्हिलियर्स हा जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण आम्हाला नैतिकता आणि सिद्धांतांवर खरं उतरायचं होतं. हा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला कोणताही खेद नाही,' लिंडा झोंडींचं हे प्रसिद्धी पत्रक दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवर शेअर केलं आहे. 

p>

Read More