Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड संघात आज उपांत्य सामना

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे.  

 World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड संघात आज उपांत्य सामना

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

आज पावसामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत उपांत्य फेरीचा सामना झाला नाही तर बुधवारचा राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. हा उपांत्य सामना बुधवारी खेळवला जाईल. मात्र बुधवारीही पाऊस सुरू राहिल्यास भारत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल. विश्वविजेता बनण्यापासून भारतीय क्रिकेट संघ आता केवळ दोन विजय दूर आहे.

उपांत्य फेरीत आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. साखळी फेरीत भारतानं किवींपेक्षा चांगली कामगिरी केली असून या सामन्यात भारताचं पारड जड वाटतंय. आतापर्यंत विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये ८ मुकाबले झाले असून भारतानं ३ तर न्यूझीलंडनं ४ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

दरम्यान, विश्वचषकात भारतीय फलंदाज रोहित शर्मा तुफान फलंदाजी करत आहे. एकाच स्पर्धेत पाच शतकांचा विक्रम तर त्याने केलाच आहे. मात्र आणखी एक मोठा विक्रम त्याच्या नावे होण्याची दाट शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जागतिक विक्रमापासून रोहित केवळ २७ धावा दूर आहे. 

ज्या पद्धतीने रोहितची तुफान फलंदाजी सुरु आहे, ती पाहता तो या स्पर्धेतच हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सचिननं २००३च्या विश्वचषकात ११ सामन्यात एकूण ६७३ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मानं यंदाच्या विश्वचषकात ८ सामने खेळून ५ शतकं आणि एका अर्धशतकासह ६४७ धावा केल्या आहेत.  

Read More