WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 सध्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवली जात असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात सामना खेळवला जात आहे. यात आज सामन्याच्या चौथ्या दिवशी गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेच्या एडन मारक्रमने दमदार शतक ठोकलं तर कर्णधार तेंबा बवूमाने सुद्धा अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी हातातून निसटताना पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चवताळले. तर आता काहीही करून चॅम्पियन होण्याची संधी गमवायची नाही यासाठी साऊथ आफ्रिकेचे खेळाडू जीव ओतून खेळताना दिसतायत. याच दरम्यान मैदानावर धक्काबुक्की, धडपड, Killer Looks असा ड्रामा पाहायला मिळतोय. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये साऊथ आफ्रिका इतिहास रचण्याच्या जवळ आहे. ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर ऑल आउट केले. मात्र त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं ज्यामुळे साऊथ आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचं आव्हान मिळालं.
विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात साऊथ आफ्रिकेच्या एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ 213 धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी साऊथ आफ्रिकेला केवळ 69 धावांची आवश्यकता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद आपल्या हातून निसटताना पाहताना पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चवताळले.