Yash Dayal : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलेला आहे. गाझियाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेने मागच्या आठवड्यात यश दयालवर पाच वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. इतकंच नव्हे तर ही तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर बुधवारी यशनेही आपली बाजू मांडत, प्रयागराजच्या पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. एवढ्यावरच न थांबता यशने अलाहाबाद हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले असून हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर याबाबत तक्रार दाखल केली आहे. इंदिरापूरम सर्कल ऑफिसरकडे याची अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तिने यशविरोधात व्हिडिओ कॉल्स, चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि फोटो यासारखे पुरावे सादर केले आहेत.
ती महिला म्हणाली की, "त्याने मला आपल्या कुटुंबाशी भेटवलं, पतीसारखं वागलं आणि यामुळे मला विश्वास बसला. मात्र जेव्हा मला त्याच्या खोटेपणाची जाणीव झाली आणि मी विरोध केला, तेव्हा त्याने माझ्यावर हात उगारला. याशिवाय त्याने माझा मानसिक छळही केला. या नात्यात मी केवळ भावनिकच नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप त्रासली होते." पीडितेचा दावा आहे की, यश फक्त तिच्याशीच नाही तर इतर अनेक महिलांशीही अशाच पद्धतीचे फसवे संबंध ठेवत होता. "माझ्यावर जे घडलं, ते त्याने इतर महिलांसोबतही केलं आहे. मात्र पोलिसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं." असं ती म्हणाली.
6 जुलै रोजी गाजियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेच्या तक्रारीवरून यश दयालवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता यश दयाल यांनी या एफआयआरला इलाहाबाद उच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे. गाझियाबादमध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर, यश दयाल यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
लैंगिक छळाच्या आरोपावर यश दयालने सुद्धा मौन सोडलं. त्यानं बुधवारी पोलीस स्थानकात तक्रार देत महिलेवर गंभीर आरोप करत म्हटले की, "ही मुलगी 2021 साली इंस्टाग्रामवर भेटली होती. तेव्हापासून आमचं बोलणं सुरू झालं. हळूहळू तिच्याकडून माझ्यावर तिचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उपचारासाठी लाखो रुपये मागितले. मी ती मदत केली, पण आजतागायत एक रुपयाही परत केला नाही." यशच्या म्हणण्यानुसार, केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर त्याचा iPhone आणि लॅपटॉप देखील तिने चोरून नेला, असा दावा त्याने आपल्या तीन पानी तक्रारीत केलाय. तसेच त्याने खुल्दाबाद पोलीस स्टेशन, प्रयागराज येथे तिला गुन्हेगारी स्वरूपात नोंदवून FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.