Vinod Kambli: भारतीय क्रिकेटचा एकेकाळी चमकणारा तारा असलेल्या विनोद कांबळीचे आयुष्य आता तरुणांसाठी महत्त्वाचा धडा बनलाय. तो एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा मोठा खेळाडू मानला जायचा पण ग्लॅमर आणि वाईट सवयींनी त्याची कारकीर्द उद्ध्वस्त केली. अलिकडेच मुंबईतील रमाकांत आचरेकर स्मारकाच्या उद्घाटनादरम्यान, कांबळीची प्रकृती पाहून लोक थक्क झाले. त्याच्या आरोग्याच्या समस्या आणि अलिकडच्या खुलाशांमुळे तो पुन्हा चर्चेचा विषय बनलाय.
अलीकडेच, विनोद कांबळीची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याला मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतय. त्याची प्रकृती पाहून 1983 च्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याच्या पुनर्वसनासाठी मदत देऊ केली. कांबळीने ही मदत स्वीकारली. काबंळीला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता यापुढे त्याने निरोगी आणि आनंदी जीवन जगावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द उत्तम प्रकारे सुरू झाली. 1990 च्या दशकात त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती. कांबळी हा सचिनपेक्षाही अधिक प्रतिभावान होता. पण शिस्त आणि कठोर परिश्रमाने सचिनने क्रिकेटचा देव म्हणून स्थान मिळवले. कांबळी ग्लॅमर आणि चुकीच्या सवयींच्या जाळ्यात अडकला. दारू, सिगारेट आणि पार्ट्यांमुळे त्याची कारकीर्द संपली, असे अनेकांना वाटते.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज योगराज सिंग यांनी अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला. जेव्हा कांबळी त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता तेव्हा चुकीचा मार्ग टाळण्याचा सल्ला मी दिला होता, असे योगराज सिंग म्हणाले. 'मी कांबळीला दारू पिणे, सिगारेट पिणे आणि मुलींसोबत पार्टी करणे थांबवण्यास सांगितले होते. या मार्गावर चालल्याने तू बर्बाद होशील असेही म्हटले होते. पण 'हे ग्लॅमर आहे, मी राजा आहे.', असे उत्तर त्यावेळी कांबळीने दिल्याचे योगराज म्हणाले. कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही आणि कांबळीला त्याची किंमत मोजावी लागल्याचेही योगराज पुढे म्हणाले.
विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात जातोय. तो मूत्र संसर्ग, मेंदूतील गुठळ्या आणि हृदयाच्या समस्यांनी ग्रस्त आहे. विनोद कांबळीने त्याच्या वागण्यामुळे त्याची शानदार क्रिकेट कारकीर्द गमावल्याचे लोकांना वाटते.
तो सचिन तेंडुलकर सारखा भारतीय क्रिकेटमधील तरुण खेळाडूंपैकी एक होता. ज्याने 1991 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कांबळीने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्या सात सामन्यांमध्ये दोन द्विशतके आणि दोन शतके झळकावून आपली प्रतिभा दाखवली. डावखुरा विनोद कांबळी फक्त 17 कसोटी सामने खेळला.
INSIDESPORT EXCLUSIVE
— InsideSport (@InsideSportIND) June 11, 2025
YOGRAJ SINGH SAID:
“I suggested Vinod Kambli to stop partying, smoking cigarettes and going to the girls, otherwise you will be finished and you will be crying. He told me that now he is the king and that my time was over” #CricketTwitter pic.twitter.com/hx0KQNBVzC
कांबळीने त्याचा शेवटचा कसोटी सामना 1995 मध्ये खेळला. त्याने 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. ज्यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतके होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या 227 होती. कांबळीने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2477 धावा केल्या. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना 2000 मध्ये खेळला. त्याने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि 2011 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.