Marathi News> टेक
Advertisement

...अन् अ‍ॅपलनं 5 विमानं भरुन iPhones भारतातून अमेरिकेत नेले; अवघ्या 3 दिवसात पाठवला माल

Apple Shipped 5 Planes of iPhones: कंपनीने हा मोठा निर्णय घेण्यामागे काही विशेष कारणं असून याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

...अन् अ‍ॅपलनं 5 विमानं भरुन iPhones भारतातून अमेरिकेत नेले; अवघ्या 3 दिवसात पाठवला माल

Apple Shipped 5 Planes of iPhones: जगभरामध्ये सध्या चर्चा आहे ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसं धोरणाप्रमाणे लागू केलेलं टॅरिफ! ट्रम्प यांनी नवे टॅरिफ दर जाहीर केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये पडझड दिसून आली. या नव्या करधोरणामध्ये अडकून अधिक पैसे मोजावे लागू नये म्हणून जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीने मागील तीन दिवसांमध्ये एक मोठा निर्णय घेत तो अंमलात आणला. 

पाच विमानं भरुन आयफोन अमेरिकेत नेले

अ‍ॅपल कंपनीची निर्मिती असलेले आणि भारतात तयार होणारे आयफोन आणि इतर इलेक्ट्रीक उपकरणं नवीन कर लागू होण्याआधीच अमेरिकेत नेण्यात आली. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठ्याप्रमाणात टॅरिफ लावलं जाणार असल्याने आर्थिक फटका बसू नये म्हणून अ‍ॅपलने हा निर्णय घेत अंमलात आणला. पाच विमानं भरुन आयफोन आणि इतर इलेक्ट्रीक उपकरणं भारतातून अमेरिकेत नेण्यात आली आहे. 

...म्हणून घेण्यात आला मोठा निर्णय

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे सर्व सामान अमेरिकेत पाठवण्यात आलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लागू करण्यात आलं. 5 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलेलं. या नव्या कर धोरणानुसार भारतातून अमेरिकेत सामान घेऊन जाण्यासाठी कंपनीला अधिक पैसे खर्च करावे लागले असते. हेच अतिरिक्त पैसे भरण्याचं टाळण्यासाठी, अ‍ॅपल कंपनीने भारत आणि चीनमध्ये तयार करण्यात आलेले प्रोडक्ट्स अमेरिकेतली गोदामांमध्ये ठेवण्यासाठी पाठवून दिले. सामान्यपणे या कालावधीमध्ये कंपनी मोठ्याप्रमाणात अमेरिकेत सामान आणि प्रोडक्ट्स पाठवत नाही मात्र करासंदर्भातील गोंधळामुळे यंदा हा मोठा निर्णय घेण्यात आला. 

...तर आयफोन महागणार

तयार प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रमाणात जुन्या कर प्रणालीनुसार मायदेशी आणण्याच्या हेतूने अ‍ॅपलने हा निर्णय घेतला आहे. या खेपेला अमेरिकेत नेलेले प्रोडक्टस कंपनी आहे त्या रक्कमेला विकू शकते. किमान स्टॉक असेपर्यंत तरी अ‍ॅपलला या दरात प्रोडक्टस विकता येतील. यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार पडणार नाही. भारतात तसेच इतर देशांमध्ये प्रोडक्टसची किंमत वाढवण्याचा सध्या कंपनीचा कोणाताही विचार नाही. मात्र टॅरिफ असाच वाढत राहिला तर किंमत नक्कीच वाढेल असं सांगितलं जात आहे.

चीनपेक्षा भारत परवडला

अ‍ॅपलच्या निर्मितीसंदर्भातील धोरणांमध्ये भारताला विशेष महत्त्व आहे. 9 एप्रिलपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के कर आकारला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अ‍ॅपल कंपनी ही चीनपेक्षा भारतावर अधिक अवलंबून राहील असं सांगितलं जात आहे. यामागील कारण म्हणजे चीनवर अमेरिकेने 104 टक्के कर लादला असून भारतावर 26 टक्के कर लादण्यात आला आहे. यामुळेच अ‍ॅपलसाठी भारत हा पहिला पर्याय असेल यात शंका नाही.

Read More