Car Tips : कार चालवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मुळात कार चालवताना क्लच, गिअर, ब्रेकसह स्टिअरिंग व्हीलवर चालकाचं असणारं नियंत्रण या गोष्टीच चालकाचं वाहनावर असणारं नियंत्रण दाखवून देत असतात. यामध्ये कार थांबवणं फारच सोपं.
काही मंडळी कार थांबवण्यासाठी आधी क्लच दाबतात, तर काही मंडळी थेट ब्रेक. प्रत्येक चालकानुसार कार थांबवण्याची पद्धत बदलत जाते. मात्र कार थांबवण्याची योग्य पद्धत कोणती याची तुम्हाला कल्पना आहे का?
वाहन चालवणं शिकत असताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर. अनेकांना क्लच आणि ब्रेक नेमका कधी वापरायचा आहे हे शिकण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. चालत्या कारला थांबवण्यासाठी आधी क्लच दाबायचा की आधी ब्रेक? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो.
तुम्हा जेव्हा हायवेवर असता तेव्हा कार प्रचंड वेगात असते. अशा परिस्थितीमध्ये जर कारचा वेग कमी करायचा असेल तर सर्वप्रथम ब्रेक पॅडल दाबावा लागतो. यानंतर क्लच दाबून वेगानुसार गिअरसुद्धा कमी करावा लागतो. म्हणजेच हायवेवर कार असताना आधी ब्रेक आणि नंतर क्लचचा वापर.
जर तुमची कार शहरातील वाहतूककोंडीतून वाट काढत चालत असेल तर, अशा परिस्थितीत कारचा वेग फार नसतो. त्यामुळं आधी ब्रेक दाबला तर कार बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा स्थितीत आधी क्लच दाबून नंतर ब्रेकचा वापर करावा.
वाहन कोणतंही असो, ते चालवत असताना वाहनासह वाहनातून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चालकावर असते. त्यामुळं वाहन चालवत असताना कायमच रस्ते नियमांचं पालन करणं, सीट बेल्टचा वापर करणं, वेगमर्यादेवर लक्ष ठेवणं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणं अशा गोष्टी लक्षात घ्याव्यात.