Instagram Account Sexual Harassment: दहिसर पोलिसांनी बेंगळुरू येथील एका 25 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. या तरुणाने महिलांचे हजारो बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार केले होते. या तरुणीने हजारो महिलांचे फोटो अश्लील सामग्रीमध्ये रूपांतरित केले होते. नंतर हा तरुण या महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करायचा. आरोपी शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग हा मूळचा बिहारमधील भागलपूरचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगने 100 हून अधिक 'जीमेल' अकाउंट तयार केले. या अकाऊंटचा वापर करून त्याच्या फ्रेंड रिक्वेस्टकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा संभाषणात सहभागी होण्यास नकार देणाऱ्या महिलांचे हजारो बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल शुभमने उघडले.
महिलांचे बनावट अकाउंट उघडल्यानंतर शुभमने महिलांचे फोटो अश्लील फोटोंसहीत मॉर्फ केले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमुळे शुभमची रिक्वेस्ट न स्वीकारणाऱ्या, त्याच्याशी चॅट न करणाऱ्या या महिला सेक्स वर्कर असल्यासारखे वाटू लागले. या महिलांच्या मॉर्फ फोटोंबरोबरच शुभमने बनावट सेवा आणि दरांची यादी करुन ती शेअर केली.
जेव्हा त्याच्या पीडितांनी अश्लील प्रोफाइल हटवण्याची विनंती केली तेव्हा सिंगने कथितपणे व्हिडिओ कॉलद्वारे व्हर्च्युअल सेक्स किंवा नग्न फोटोंची मागणी केली. अनेक प्रकरणांमध्ये, महिलांनी अपमानित आणि दबावाखाली त्याच्या मागण्या मान्य केल्या.
कांदिवली पूर्वेतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील 19 वर्षीय बीएससी विद्यार्थिनीसोबतही असा प्रकार घडला. सिंगने तिच्या मॉर्फ केलेले फोटो वापरून सलग तीन दिवस म्हणजेच 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी तिच्या नावाने तीन बनावट खाती तयार केली. विद्यार्थिनीने मित्रांशी सल्लामसलत केल्यानंतर, पहिली दोन खाती ब्लॉक केली. मात्र तिसरं खातं समोर आल्यानंतर तिने सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
सिंग पूर्वी माहिती तंत्रज्ञानात डिप्लोमा करत होता आणि त्याला ग्राफिक्स, एचटीएमएल, कोरलड्रॉ, नेटवर्किंग आणि संगणक ऑपरेशन्सचे तांत्रिक ज्ञान आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. त्याने गुन्हेगारी कारवायांसाठी आपल्या कौशल्यांचा वापर केला. "सिंग कंप्युटर वापरात प्रवीण होऊ लागला आणि कामाच्या शोधात बेंगळुरूला गेला. आयटीमध्ये नोकरी न मिळाल्याने तो एका औद्योगिक कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागला आणि गुप्तपणे हे गुन्हे करत राहिला," असे दहिसर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
डीसीपी (झोन 12) महेश चिमटे आणि वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय अंकुश दांडगे आणि पीएसआय श्रद्धा पाटील आणि वैभव ख्वाकर यांचा समावेश असलेल्या दहिसर पोलिसांच्या सायबर टीमने इंस्टाग्राम आणि फेसबुक नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने सिंगचा शोध घेतला. त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सबदूर भागातील त्याचा आयपी अॅड्रेस ट्रॅक केला आणि रविवारी त्याला अटक केली. सिंगला सोमवारी मुंबईत आणण्यात आले आणि बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली.