How to Skip Amitabh Bachchan Voice on Call: देशात सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने दूरसंचार कंपन्यांना जागरूकता पसरवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कॉलपूर्वी सायबर क्राइम अवेअरनेस कॉलर ट्यून वाजलेली तुम्ही ऐकली असेल. या कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अज्ञात कॉल, लिंक शेअर करणे किंवा ओटीपी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे असले तरी अनेक लोक वारंवार ही ट्यून ऐकून त्रासलेले आहेत. विशेषतः जेव्हा त्यांना आपत्कालीन परिस्थितीत कॉल करावा लागतो, तेव्हा ही ट्यून ऐकल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग अशावेळी काय करावं? असा प्रश्न पडतो. तुम्ही बटण दाबून ही कॉलर ट्यून सहजपणे वगळू शकता.
राजस्थान पोलिस उपनिरीक्षक आरती सिंह तंवर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ही ट्रिक शेअर केली आहे. त्याची पद्धत खूप सोपी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करता आणि सायबर क्राइम अवेअरनेस ट्यून सुरू होते, तेव्हा तुमच्या फोनचा कीपॅड किंवा डायल पॅड उघडा. आता कीपॅडवर नंबर 1 दाबा. तुम्ही हे करताच, कॉलर ट्यून लगेचच वगळला जाईल आणि तुमचा कॉल वाजू लागेल.
वारंवार कॉल करतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत लगेच बोलू इच्छितात, अशा लोकांसाठी ही युक्ती कामाची आहे. चाचणी दरम्यान, ही पद्धत आयफोनवर उत्तम प्रकारे काम करते असे आढळून आले. परंतु ही ट्रीक काही अँड्रॉइड फोनवर काम करू शकत नाही. कारण ते टेलिकॉम सेवा प्रदात्यावर अवलंबून असते.
केंद्र सरकारची नोडल एजन्सी असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने दूरसंचार विभागाला निर्देश दिले होते. यानंतर दूरसंचार कंपन्यांनी सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी कॉलर ट्यून आणि प्री-कॉल संदेश लागू केले. ही मोहीम तीन महिने चालेल आणि विविध संदेशांद्वारे लोकांना सायबर फसवणूक टाळण्याचे मार्ग सांगितले जातील. आरबीआयच्या अहवालानुसार 2020 मध्ये सायबर गुन्ह्यांचे 8703 प्रकरणे नोंदवण्यात आली. ज्यामुळे 185468 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सध्या ही कॉलर ट्यून कायमची बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही, कारण ती सरकारच्या जागरूकता उपक्रमाचा भाग आहे. असे असले तरी कॉल दरम्यान ती मॅन्युअली वगळण्याची पद्धत वेळ वाचवू शकते.
जर तुम्ही सायबर फसवणुकीचा बळी पडलात तर ताबडतोब 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (cybercrime.gov.in) वर तक्रार दाखल करा.