Meta Big Decision About Instagram: व्हॉट्सअपनंतर तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे इन्स्टाग्राम! दिवसातील अनेक तास या इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहण्यात जातात. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांखालील युझर्सचीही संख्या लक्षणीय आहे. याचीच दखल घेत आता इन्स्टाग्रामने महत्त्वाचा नियम बदलला आहे. याचा थेट परिणाम 16 वर्षांखालील युझर्सला बसणार आहे.
नव्या नियमानुसार, 16 वर्षांखालील मुलांना त्यांच्या पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टाग्रामवरुन आता थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) करता येणार नाही. तसेच नग्नतेशी संबंधित ‘कंटेंट’ म्हणजेच न्यूडिटी मार्क केलेला कंटेटं त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाही.
फेसबुक, इन्स्टाग्रामची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने 18 वर्षांखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक सक्षम करण्याच्या हेतूने हे बदल केले आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांत ते जगभरात अमलात येतील.
नव्या सुधारणांनुसार इन्स्टाग्रामवरील खातं खासगी ठेवता येणार आहे. तसेच अनोळखी व्यक्तींकडून येणारे डायरेक्ट मेसेज ब्लॉक करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. हाणामारीसारखी संवेदनशील दृशांचा रिच मर्यादित करण्यात आला आहे. 60 मिनिटं झाल्यानंतर अॅप बंद करण्याची आठवण करुन देणारे नोटिफिकेशन येतील. तसेच रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन्स येणार नाहीत, अशीही सोय करण्यात आली आहे.
मेटाच्या मालकीच्या फेसबुक व मेसेंजरवरील किशोरवयीन युझर्सची खातीसुद्धा अशाच प्रकारचे स्वयंचलितपणे संरक्षित करण्यात येतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अनुचित व अनावश्यक भाग वगळून संदेशांची देवाण-घेवाण करता येईल. तसेच किशोरवयीन युझर्सचा वेळ योग्यरीत्या वापरला जात आहे की नाही याची खात्री करुन घेतली जाईल. सप्टेंबरपासून या नियोजनाद्वारे किमान 54 लाख किशोरवयीन युझर्सची खाती सुरु करण्यात आली आहेत, असे ‘मेटा’ने सांगितले आहे.
मेटाबरोबरच अनेक सोशल नेटवर्किंग साईट्स किशोरवयीन युझर्सच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेताना दिसत आहेत. मात्र खोटं वय टाकून सोशल नेटवर्किंगसाईटवर सक्रीय असलेल्या किशोरवयीन युझर्सची संख्याही जास्त आहे.