Yavatmal : यवतमाळच्या वणी येथे भटक्या कुत्र्याने चिमुकल्या मुलावर हल्ला चढवीत त्याला गंभीर जखमी केले आहे. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यवतमाळच्या सदाशिवनगरमध्ये ही घटना घडली असून दोन मुले सायकल चालवत असताना एका कुत्र्याने एका मुलावर झडप घेत त्याला खाली पाडून मुलावर हल्ला करत चावा घेतला.
दरम्यान, या मुलाने कशीबशी त्या कुत्र्याच्या ताब्यातून आपली सुटका केली आणि लगेच तो धावत सुटला. या घटनेमुळे घराबाहेर खेळणारी मुले व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वणीत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.
नेमकं काय घडलं?
वणी शहरातील सदाशिवर नगरमध्ये मंगळवारी 11 मार्च रोजी सायंकाळी 5.40 वाजता दोन मुले सायकल खेळत होती. सायकल खेळत खेळत ती अनिल उतरवार यांच्या घरासमोर आली. त्यावेळी तिथे गल्लीत एक मोकाट कुत्रा देखील फिरत होता. 5 ते 6 वर्षांचा मुला सायकल खेळत असताना कुत्र्याने थेट त्या मुलाला हल्ला केला. त्यानंतर मुलाने आरडाओरड सुरु केला. पण तेवढ्यात त्या लहान मुलाने त्या कुत्र्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि लगेच तेथून धावत सुटला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये मुलाचा आवाज ऐकून तेथे राहत असणाऱ्या काही महिला घराच्या बाहेर आल्या. तर गाडीच्या मागे असणार्या महिलेने त्या कुत्र्याला दगड मारला. या संपूर्ण घटनेनंतर या परिसरात लहान मुलांच्या पालकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
राज्यात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनेत मोठी वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासोबत भटक्या कुत्र्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून भटके कुत्रे रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या मागे लागतात. यामुळे चालकाचे लक्ष भटकते आणि अपघात होतात. आता लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबत पालिकेने आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.