Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

आणखी एका दुधाच्या टँकरची तोडफोड, आंदोलनाची हिंसक सुरुवात

टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले.

आणखी एका दुधाच्या टँकरची तोडफोड, आंदोलनाची हिंसक सुरुवात

सांगली: दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आणखी एका दुधाच्या टँकरची तोडफोड केली. हा टँकर सांगलीतील वारणा दूध संघाचा होता. स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर टँकर अडवून त्याची तोडफोड केली. त्यानंतर टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 
 
 तत्पूर्वी रविवारी दुपारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्येही अशाचप्रकारे टँकरची तोडफोड केली. चालकाला खाली उतरवून हा टँकर पेटवूनही देण्यात आला. त्यामुळे दुधाच्या टँकर्सना संरक्षण देऊ, असे आश्वासन देणाऱ्या दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची कोंडी झाली आहे. 
 

दरम्यान, या घटनांनंतरही जानकर यांनी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असे सांगितले. आंदोलकाविषयी आपण बोलणार नाही, पण कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाणार आहे. मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही. दूध उत्पादकांनी कोणालाही न घाबरता दूध पुरवठा करावा, त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. दुधाला 20 तारखेपासून 3 रुपये दरवाढ केली जाणार आहे आणि जीएसटी कमी झाल्यास 2 रुपये होणार कमी आहेत. अशी एकूण 5 रुपये दरवाढ केलीच आहे, असे स्पष्टीकरण यावेळी जानकरांनी दिले.

Read More