Bengaluru Horror Maharashtra Woman Body Found In Suitcase: कर्नाटकमधील बंगळुरु येथे एका 32 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरात बॅगेत भरुन ठेवल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उढाली आहे. मयत महिला ही महाराष्ट्रातील असून तिचं नाव गौरी खेडेकर असं आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून गुन्हा केल्यानंतर आरोपीनेच घरमालकाबरोबरच सासरवाडीलाही फोन करुन आपण पत्नीचा खून केल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणानंतर गौरीचा पती राजेश राजेंद्र खेडेकर हा शहर सोडून पळून गेला. राजेशला बंगळुरु पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याला बंगळुरु पोलिसांनी पुन्हा बंगळुरुला नेल्याची माहिती, पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिली आहे. गौरी आणि तिचा पती राकेश हे दोघे डोक्काकमानाहल्ली येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहायला आले होते. डेक्कन होराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच हे दोघे या ठिकाणी राहायला आलेले. दोन वर्षांपूर्वी गौरी आणि राजेशचं लग्न झालं होत.
राजेश हा एका नामांकित कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तो घरुनच काम करायचा. तर गौरीचं मास मिडियामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ती बंगळुरुमध्ये नोकरीच्या शोधात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईला रवाना झाला. त्यापूर्वी त्याने घरमालकाला फोन करुन मी माझ्या बायकोची हत्या केली आहे असं सांगितलं. घरमालकाने तातडीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली.
हुलिमाऊ पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या डोक्काकमानाहल्लीमधील इमारतीत पोलीस पोहोचल्यानंतर त्यांना गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी गौरीच्या मृतदेहावर चाकूने हल्ला केल्याचे व्रण आहेत असं सांगितलं आहे. "आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला बंगळुरुमध्ये आणलं जात आहे," असं सारा फातिमा म्हणाल्या. ही हत्या का करण्यात आली यामागील कारणाचा खुलासा झाला नसून पोलीस तपासात सत्य समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने सासरवाडीला फोन करुन पत्नीची हत्या केल्याची माहिती दिल्याचं काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं असलं तरी पोलिसांनी असा कोणातही फोन कॉल झाला की नाही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.