Marathi News> विश्व
Advertisement

मेक्सिकोमध्ये धार्मिक कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, पाहा हल्ल्याचा LIVE व्हिडीओ; 12 जण जागीच ठार

Mexico Firing: गोळीबार सुरू झाला तेव्हा लोक रस्त्यावर नाचत आणि मद्यपान करत सेलिब्रेशन करत होते.  

मेक्सिकोमध्ये धार्मिक कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, पाहा हल्ल्याचा LIVE व्हिडीओ; 12 जण जागीच ठार

Mexico Firing: मेक्सिकोमध्ये धार्मिक कार्यक्रमात लोक आनंद साजरा करत असतानाच अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. शस्त्रधारकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 12 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. मेक्सिकोमधील हिंसेने प्रभावित असणाऱ्या गुआनजुआटोमध्ये ही घटना घडली आहे. या राज्यात नेहमी गँगवॉर सुरु असतं. मेक्सिकोमध्ये रस्त्यांवरील हिंसाचार हा फार रक्तरंजित इतिहास आहे. 

गुआनजुआटोच्या इरापुआटो शहरात ही घटना घडली आहे. स्थानिक लोक सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या सन्मानार्थ नाचत आणि मद्यपान करत असतानाच हल्लेखोरांनी गोळीबार केला. 

घटनास्थळी सेलिब्रेशन सुरु असताना त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जात होतं. लोक आनंदात डान्स  करत असतानाच काही वेळात गोळीबाराचा आवाज ऐकू येतो आणि घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरुण आणि तरुणी बेधुंदपणे नाचताना दिसत आहेत. सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतानाच काही सेकंदात गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. यानंतर तिथे रक्ताचा सडा पडतो. 

इरापुआटोचे अधिकारी रोडोल्फो गोमेझ सर्व्हेंटेस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. तसंच 20 जण जखमी झाले आहेत.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला असून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात, ग्वानाजुआटोमधील सॅन बार्टोलो डी बेरिओस येथे कॅथोलिक चर्चने आयोजित केलेल्या पार्टीला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता.

मेक्सिको सिटीच्या वायव्येस असलेले ग्वानाजुआटो हे देशातील सर्वात हिंसक राज्यांपैकी एक आहे. येथे विविध संघटित गुन्हेगारी गट वर्चस्वासाठी लढत आहेत. वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत राज्यात 1435 हत्यांची नोंद झाली आहे, जे इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत दुप्पट आहेत.

Read More