पत्नीने सोबत फोटो काढण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टर पतीने तिच्या डोक्यात दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही, तर यानंतर त्याने तिला कड्यावरुन खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 46 वर्षीय गेरहार्ट कोनिग याच्यावर पत्नी एरियल कोनिग हिच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे जोडपे ओआहूमध्ये सुट्टीवर होते तेव्हा कोनिगने 36 वर्षीय पत्नीला पाली लूकआउटजवळ हायकिंग ट्रेलवरून ढकलल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनसुार, नुआनु पाली लूकआउट येथून ओआहू किनारपट्टीपासून एक हजार फूट उंचीवर असलेल्या ठिकाणावरून कूलाऊ कड्यांच्या आणि विंडवर्ड कोस्टचे दर्शन होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेरहार्ट कोनिग याने पत्नीने फोटो काढण्यास नकार दिल्याने तिच्यावर हल्ला केला.
आरोपी पतीने पत्नीवर एकामागोमाग अनेकदा मारहाण केली. तसंच तिच्या डोक्यावर दगडाने वार केला. याशिवाय दोन इंजेक्शनच्या सहाय्याने तिला भोसकण्याचा प्रयत्न केला. या इंजेक्शनमध्ये कोणत्या प्रकारचं ड्रग होतं का हे स्पष्ट झालेलं नाही असं वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिलं आहे.
सोमवारी रात्री पाली हायवेजवळ थोड्या वेळासाठी पाठलाग केल्यानंतर होनोलुलु पोलिसांनी कोनिग याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आदल्या दिवशी त्याचा फोटो असणारे बोर्ड लावले होते. यामध्ये त्यांनी पाली लूकआउट येथे एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा शोध सुरू असल्याचे म्हटलं होतं.
सोमवारी पहाटे झालेल्या कथित हल्ल्यानंतर, होनोलुलु पोलिसांनी वृत्त दिलं की एरियल कोनिगच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा झाल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं.
सीबीएस संलग्न केजीएमबीने दिलेल्या वृत्तानुसार, कोनिग अॅनेस्थेसिया मेडिकल ग्रुपमध्ये डॉक्टर आहे. चौकशी होत असतानाच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.