Marathi News> विश्व
Advertisement

हायवेलगत सापडले 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह; पिशवीत सापडले सर्वांचे कापलेले हात, पोलिसही हादरले!

Bodies of Nine Missing Students Found: हे सर्व विद्यार्थी त्यांच्या पदवीची परीक्षा संपल्यानंतर सहलीसाठी गेले होते.

हायवेलगत सापडले 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह; पिशवीत सापडले सर्वांचे कापलेले हात, पोलिसही हादरले!

Bodies of Nine Missing Students Found: दक्षिण मॅक्सिकोमध्ये मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या 9 मुलांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले आहेत. हायवेच्या बाजूला हे मृतदेह आढळून आले असून पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व मुलांचे हात कापून एका पिशवीत भरण्यात आले होते. ही पिशवही पोलिसांना सापडली असून या क्रूर हत्याकांडाचं गूढ अधिक वाढलं आहे.

सहलीला गेले होते विद्यार्थी

पदवी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर नऊ विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सहलीला गेले होते. मात्र ही मुलं घरी परतलीच नाहीत. यासंदर्भात त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मागील अनेक आठवड्यांपासून या मुलांचा शोध घेतला जात होता. ही मुलं सुरक्षित असतील आणि ती लवकरच सापडतील अशी त्यांच्या पालकांची अपेक्षा होती. मात्र या सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून पोलिसही हादरुन गेले आहेत.

क्रूरपणे हत्या

एका निर्जनस्थळी या 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. मृतदेहांवरील व्रण पाहून या मुलांचा छळ करण्यात आल्याचं अधोरेखित होत असून क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आल्याचंही स्पष्ट होतं आहे. मृतदेह सापडल्यानंतर मॅक्सिको पोलीस खडबडून जागे झाले असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन मुलांना न्याय देण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. 

पालकांना मोठा धक्का

मुलांचे मृतदेह इतक्या छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने मुलांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी उत्तर द्यावं अशी पालकांची मागणी आहे. या हत्याकांडाचे तपशील समोर आल्यापासून स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण असून परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. 

काही अवशेष अजून सापडलेले नाहीत

काही मृतदेहांचे अवशेष अजूनही सापडलेले नाही. त्या अवशेषांचा शोध सुरु आहे. मॅक्सिको देशामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण फार अधिक आहे. या देशामध्ये अंमली पदार्थांची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. या देशामध्ये पर्यटकांनी रात्रीच्या वेळी बाहेर भटकणे, टॅक्सीने प्रवास करणे किंवा चित्रपट पाहायला जाणे हे सुरक्षित मानलं जात नाही.

वर्षभरात 30000+ हत्या

2023-24 मध्ये मॅक्सिकोत 30 हजारांहून अधिक हत्या झाल्या आहेत. देशाच्या इतिहासातील हे सर्वात रक्तरंजित वर्ष ठरलं आहे. त्यातच आता अगदी विद्यार्थ्यांचं अशाप्रकारे हत्याकांड झाल्याने लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Read More