ब्रिटनचे ऐतिहासिक वेस्टमिंस्टर एब्बे येथे आयोजित केलेल्या 'कॉमनवेल्थ डे 2025' च्या समारंभात ब्रिटनचे राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले गेले. या स्वागत समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
स्कॉटिश बॅगपाइप आणि भारतीय संगीताचे एकत्रीकरण करणारा 'श्री मुक्तजीवन स्वामीबापा पाईप बँड'ने या समारंभात एक उत्तम संगीत सादरीकरण केले. हा बँड, यूके, भारत, अमेरिका आणि केनियामध्ये कार्यरत आहे. हा बँड त्यांच्या खास गाण्यांच्या एकत्रीकरण परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. या बँडने 'कॉमनवेल्थ डे 2025' या समारंभात 'धूम मचाले' या गाण्यावर ढोल वाजवत किंग चार्ल्स आणि क्विन कॅमिला यांचे स्वागत केले, ज्यामुळे हा क्षण अधिक रोमांचक झाला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे प्रेक्षकांना 'धूम 2' चित्रपटातील त्या प्रसंगाची आठवण झाली जेव्हा, हृतिक रोशन ब्रिटिश राणीच्या रूपात चोरी करायला येतो. या बँडच्या सादरीकरणामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि मजेशीर कमेंट्स पसरल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, 'हृतिक रोशन कोहिनूर घेण्यासाठी आला आहे'. तर दुसऱ्याने गंमतीने म्हटले, 'ही 'धूम 4' ची सिक्रेट प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे का?' त्याच वेळी, काही नेटकऱ्यांनी असेही लिहिले, 'आता हृतिक रोशनने स्वतःला कॅमिला म्हणून वेषात घेतले आहे' या व्हिडीओवर इतर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
या सादरीकरणाने भारतीय पॉप संस्कृतीच्या जागतिक प्रभावाची एक झलक दाखवली. ब्रिटिश राजघराण्याच्या समारंभात भारतीय संगीत आणि बॉलिवूडचा समावेश झाला. त्यामुळे भारतीय संगीत आणि बॉलिवूडला जगभरात आणखी एक नवी ओळख मिळाली.
समारंभाच्या आयोजनामुळे हे स्पष्ट झाले की भारतीय संस्कृती आणि संगीत आता केवळ भारतामध्येच नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व आहे. यामुळे एक नवा सांस्कृतिक सेतू तयार झाला आहे, जिथे बॉलिवूड आणि ब्रिटिश राजघराण्याच्या विविधतेचा संगम पहायला मिळतो.