Bryan Johnson hyperbaric oxygen therapy : वाढत्या वयाच्या आकड्याला ब्रेक लावण्यासाठी म्हणून ब्रायन जॉन्सन हा अमेरिकी अब्जाधीश मागील कैक वर्षांपासून अनेक प्रयोग करत आहे. आहारातील बदलांपासून ते नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर त्यानं स्वत:च्याच शरीरार, शरीरातील पेशींमध्ये इतकंच काय तर स्वत:च्या मेंदूवरही प्रयोग केले.
पाहताक्षणी त्याचे हे प्रयोग अनेकांनाच हैराण करून गेले. मात्र आता त्यानं जवळपास 90 दिवसाच्या एका भांबावणाऱ्या प्रयोगाचे निष्कर्ष जगासमोर आणले आणि पाहणारा प्रत्येकजण थक्क झाला. जगभरात 'बायोहॅकर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रायननं hyperbaric oxygen therapy (HBOT) चा प्रयोग करत त्यामुळं वाढतं वय थांबलं असून शरीर खऱ्या अर्थानं तारुण्याच्या दिशेनं उलटा प्रवास करत असल्याचं सांगितलं. या प्रयोगातून आपण 10 वर्षांनी तरूण झाल्याचा दावाही त्यानं केला.
ब्लूप्रिंट या अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत जॉन्सननं हा प्रयोग केला. ज्यामध्ये तो दर दिवशी एका चेंबरमध्ये जाऊन 95 ते 100 टक्के शुद्ध प्राणवायू, अर्थात ऑक्सिजनच्या मदतीनं श्वासोच्छवासाठी क्रिया करत होता. ज्यामाध्यमातून त्याच्या शरीरातील पेशींमध्ये सुधारणा होऊन त्यांना पुनरूज्जीवनासही मदत झाली.
एचबीओटी ही एक वैद्यकिय उपचारपद्धती असून, यामध्ये एका निर्धारित दबावाच्या चेंबरमध्ये व्यक्तीला श्वासोच्छवासासाठी शुद्ध प्राणवायूचा पुरवठा केला जातो. यामुळं रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास सुरुवात होते, शिवाय शरीराला सूज येण्याचं प्रमाणही कमी होतं. या उपचारपद्धतीमध्ये ऑक्सिजन थेट शरीरातील प्लाझ्मामध्ये शोषला जातो, ज्या माध्यमातून खोलवर असणाऱ्या पेशींचं आरोग्य आणि रचना सुधारते. या प्रक्रियेमध्ये साधारण 60 ते 120 मिनिटांचं एक सेशन असतं असं म्हटलं जातं.
HBOT is the most effective longevity therapy I’ve done.
— Bryan Johnson (@bryan_johnson) May 29, 2025
Here's what happened. pic.twitter.com/JqMqgKqDbi
HBOT उपचार पद्धतीचे कैक फायदे असले तरीही त्याचे काही मध्यम आणि गंभीर स्तरातील दुष्परिणामही आहेत. हे परिणाम तात्पुरत्या स्वरुपातील असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मात्र तज्ज्ञ देत नाहीत. या उपचार पद्धतीच्या सामान्य दुर्लक्षणांमध्ये कान दुखणं, सायनस प्रेशर, दृष्टीदोषाचा समावेश आहे. तर, गंभीर स्तरावर फुफ्फुसांना इजा आणि कमी रक्तदाबासारख्याही समस्या भेडसावू शकतात.