China Beijing University Shocking Rules: चीनमधील बीजिंग येथील एका खाजगी विद्यापीठात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका विद्यार्थिनीला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने तिने सिक लिव्ह म्हणजेच आजारपणाची रजा मिळावी अशी मागणी केली. मात्र खरच या विद्यार्थिनीला त्रास होतोय की नाटक करत आहे हे तपासून पाहण्यासाठी चक्क या तरुणीला कॅम्पस क्लिनिकमध्ये अंडरपँट उतरवण्यास सांगण्यात आलं. मासिक पाळी खरंच आली आहे हे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थिनीला अंडरपँट काढायला भाग पाडण्यात आला असा दावा करण्यात आल्याचं 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला आहे.
चीनच्या आघाडीच्या सार्वजनिक विद्यापीठांपैकी एकाशी संलग्न असलेल्या गेंगदान इन्स्टिट्यूट ऑफ बीजिंग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे ही घटना घडली आहे. 15 मे रोजी, एका विद्यार्थिनीने या घटनेचे वर्णन करणारा एक व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला. हा व्हिडीओ चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. एका सुट्टीसाठी एवढी विचित्र आणि टोकाची मागणी का केली जात आहे? अशी विचारणा ही विद्यार्थिनी कॅम्पस क्लिनिकमधील एका महिला कर्मचाऱ्याकडे करत असल्याचं या व्हिडीओमधील चर्चेमधून स्पष्ट होत आहे.
“मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक महिलेने तिची पँट काढून तुम्हाला रजेची गरज आहे असं दाखवलं पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे का?” ती विद्यार्थिनी महिला कर्मचाऱ्याला विचारते. यावर ती महिला कर्मचारी होकार्थी उत्तर देते. "हो! हा माझा वैयक्तिक नियम नाही, तो संस्थेचा नियम आहे,” असे महिला कर्मचारी या विद्यार्थिनीला सांगते.
जेव्हा विद्यार्थिनीने या नियमावलीची लेखी प्रत मागितली तेव्हा महिला कर्मचारी काहीच बोलली नाही. मात्र मला तुझ्या रजेची नोट जारी करता येणार नाही असं ही महिला कर्मचारी तरुणीला सांगत असते. त्याऐवजी सुट्टी हवी असेल तर विद्यार्थिनीने हॉस्पिटलमधून कागदपत्रे मागवावेत असा सल्ला ही महिला कर्मचारी देते.
दुसऱ्या दिवशी, विद्यापीठाने महिला कर्मचाऱ्याच्या या कृतींचे समर्थन करणारे अधिकृत निवेदन जारी केले. ज्यामध्ये विद्यापीठाने महिला कर्मचाऱ्याने निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार काम केल्याचे नमूद केलं आहे.
“आमच्या तपासामध्ये असं दिसून आलं आहे की, क्लिनिक कर्मचाऱ्यांनी योग्य प्रोटोकॉलचे पालन केले. त्यांनी विद्यार्थिनीच्या शारीरिक स्थितीबद्दल चौकशी केली. त्यानंतर तिने केलेल्या दाव्यानुसार तिची संमती घेतल्यानंतर पुढील निदान करण्यात आलं. कोणतेही उपकरण किंवा शारीरिक तपासणी यावेळी करण्यात आलेली नाही,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
विद्यापीठात काम करणाऱ्या झू आडनावाच्या कर्मचाऱ्याने 'सीएनआर न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, हे धोरण काही काळापूर्वी लागू करण्यात आलं आहे. "आजारपणाच्या रजेचा गैरवापर रोखण्यासाठी" हे नवे नियम लागू करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनींनी एकाच महिन्यात मासिक पाळीशी संबंधित रजेची अनेक वेळा विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं झूचं म्हणणं आहे.
"माझ्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनींनी वारंवार मासिक पाळीमुळे आजारी असल्याचं सांगत रजा मागितल्याचा प्रकार घडला. त्यामुळेच हा (अंडरपँट तपासण्याचा) नियम लागू करण्यात आला. एका मुलीने तर एकाच महिन्यात चार किंवा पाच वेळा मासिक पाळीची रजा मागितली. त्यामुळे हे धोरण लागू करण्याची स्वतःची काही कारणं शिक्षण संस्थेकडे होती," संही झूने म्हटलं आहे.
नंतर या विद्यार्थिनीने एक फॉलो-अप व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आजारपणाच्या रजेसाठी हॉस्पिटलमधून आवश्यक कागदपत्रे मिळवली असल्याचे सांगितले आहे. तिने विद्यापीठाच्या धोरणाच्या समर्थनार्थ उतरलेल्यांना आव्हान दिले आहे. "मला फक्त मासिक पाळीच्या वेळी महिलांना रजा कशी मागू शकतात याबद्दल एक सर्वसमावेशक आणि महिलांचा आदर करणारं धोरण हवं आहे," असं ही विद्यार्थिनी म्हणाली.
"जर संस्थेनं खरोखरच असा लेखी नियम बनवला असेल की, आजाराच्या रजेसाठी पात्र होण्यासाठी महिला विद्यार्थिनींनी महिला डॉक्टरांना मासिक पाळीचे रक्त दाखवावे, तर मी माझा व्हिडिओ काढून टाकीन. मात्र असा कोणताही नियम अस्तित्वात नसेल, तर मी मागे हटणार नाही," असं या विद्यार्थिनीने स्पष्ट केलं आहे.