Coca-Cola: कोल्ड ड्रींक... उन्हाळ्याच्या दिवसांत या शीतपेयांना इतकी पसंती दिली जाते, की दर उन्हाळ्यात एक तरी नवा ब्रँड किंवा पेय बाजारात विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळतं. अशा या शीतपेयांच्या गर्दीत साधारण 1886 पासून आपलं स्थान अबाधित ठेवणारी एक कंपनी म्हणजे कोका कोला. जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल पण, कोका कोला एका खास धर्माच्या नागरिकांसाठी वेगळ्या पद्धतीचं शीतपेय तयार करते.
पाहताक्षणी विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. कोका कोला कंपनीकडून यहूदी अर्थात 'ज्यू' धर्मातील नागरिकांसाठी त्यांच्या या शीतपेयाचा वेगळा प्रकार तयार केला जातो. सर्वसाधारण शीतपेय आणि हे विशेष शीतपेय यामध्ये बाटलीच्या झाकणावरून फरक ओळखता येतो. या खास बाटलीच्या झाकणाचा रंग लालऐवजी पिवळा असतो. आता यामागचं नेमकं कारणही जाणून घ्या...
ज्यू धर्मात एक विशेष सुट्टीचा कालावधी असतो, ज्याला पासओवर (Passover) असं म्हणतात. या कालावधीत ज्यू धर्मातील लोक मका, गहू, राई आणि बिया अशा चाही पदार्थांचं सेवन जाणीवपूर्वक टाळतात. सर्वसाधार कोकाकोलामध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, ज्यामुळं हे पेय पासओवर काळात पिणं योग्य ठरत नाही.
ज्यू धर्मातील नागरिकांच्या आहारविषयक सवयींचा आदर ठेवण्यासाठी म्हणून कंपनी पासओवर काळात त्यांच्यासाठी या पेयाचं कॉर्न फ्री वर्जन तयार करते. यावेळी त्यात कॉर्न सिरपऐवजी ऊसापासून तयार करण्यात आलेली साखर मिसळली जाते, ज्याच्या सेवनास पासओवर काळात परवानगी असते.
साधारण कोक आणि पासओवर काळातील कोकमधील फरक ओळखता यावा यासाठी कंपनीकडून त्याच्या झाकणाला चकाकणारा पिवळा रंग दिला जातो. ज्यावरून हे पेय पासओवर काळासाठी कोशर अर्थात शुद्ध असल्याचं स्पष्ट होतं. कंपनीकडून घेण्यात आलेला हा निर्णय फक्त शीतपेयातील सामग्रीतील बदलासंदर्भातील नसून, कंपनीनं एकंदरच प्राधान्य दिलेल्या प्रक्रियेलासुद्धा अधोरेखित करतं.
कमाल गोष्ट म्हणजे फक्त ज्यू च नव्हे, तर अनेक बिगर जू मंडळीसुद्धा या अनोख्या कोकच्या शोधात त्याची विक्री नेमकं कुठं होते हे पाहत असतात. ऊसाच्या साखरेपासून तयार करण्यात आलेलं कोक हे कॉर्न फ्रुक्टोजपेक्षा अधिक चवदार असतं ज्यामुळं त्याला अधिक पसंती मिळते असं म्हटलं जातं.