US Golden Dome System: जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष आणि मतभेद पाहता आता महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनं एक वेगळीच तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक अतिशय महत्त्वाची घोषणा करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. जिथं त्यांनी महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र भेदक प्रणाली अर्थात 'गोल्डन डोम' बनवण्याची घोषणा केली.
सदर प्रणालीच्या माध्यमातून अमेरिका शत्रूकडून होणारा क्षेपणास्त्रांचा मारा फार दूरवरूनच हेरणार असून त्यांना ट्रॅक करत हवेतल्या हवेतच त्यांचा खात्मा करण्याचं काम करमार आहे. ट्रम्प यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्राथमिक स्वरुपात 25 बिलियन डॉलरचा सुरुवातीचा खर्च अपेक्षित ठेवलं असून हा संपूर्ण गोल्डन डोम तयार करण्यासाठी तब्बल 175 बिलियन डॉलर इतका खर्च येणार असून, अमेरिकेतच या डोमची निर्मिती केली जाणार आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरीपर्यंत हा गोल्डन डोम अमेरिकेच्या सेवेसाठी पूर्णपणे तयार होणार असून, या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी जनरल मायकल गुएटलीन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इस्रायलच्या 'आयरन डोम' पासून ही प्रणाली प्ररित असून त्याची क्षमता मात्र याहून कैक पटींनी अधिक असून थेट अंतराळातून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे.
गोल्डन डोममध्ये शेकडो उपग्रह नेटवर्कचा समावेश असून, लाँच झाल्यानंतर काही क्षणातच या सॅटेलाईटच्या मदतीनं शत्रूनकडून होणारा मारा परतवून लावण्यास मदत करणार आहेत. रिअल टाईम डेटा शेअरिंग आणि रडार इंटेलिजेन्सची मदत इथं घेतली जाणार असून, याशिवाय त्यात AI आधारित ट्रॅकिंग आणि फायर कमांडही समाविष्ट असेल. अमेरिकेच्या संरक्षण नितीमधील स्पेस बेस्ड डिफेंस अर्थात अंतराळाच्या मदतीनं तयार झालेली सुरक्षा प्रणाली हे त्यातचं पहिलं पाऊल आहे.
ट्रम्प यांच्या माहितीनुसार कॅनडानं या प्रकल्पामध्ये रुचीसुद्धा दाखवली आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अमेरिकेकडून ही संरक्षण प्रणाली फक्त देशाच्याच संरक्षणासाठी सिमीत ठेवली नसून, नेटो देशांच्या साथीनं एका नव्या भागिदारीसाठीसुद्धा ट्रम्प यांनी तयारी दाखवली. बरं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अमेरिकेनं या निर्णयासह चीन आणि रशिया या राष्ट्रांना अप्रत्यक्षरित्या राजनैतिक संदएशही दिला असून, आता जगभरात ट्रम्प यांनी नेमका का निर्णय घेत कोणत्या युद्धाची तयारी सुरु केलीय? त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला आहे असेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.