Dubai And India : दुबई जगातील सर्वात श्रीमंत शहर. जगभरातील पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन. भारतीयांना तर दुबईचे विशेष आकर्षण आहे. दुबईबाबतचा एक शॉकिंग इतिहास फारच क्वचित लोकांना माहित आहे. एकेकाळी दुबई भारताचाच भाग होता. अगदी नकाशातही दुबई भारतात दिसायची. इतकचं नाही तर दिल्लीचे राज्य कुवेतपर्यंत पसरले होते. जाणून घेऊया नेमका इतिहास.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला दुबई, कुवेत आणि अरबी द्वीपकल्पाचा मोठा भाग ब्रिटिश भारतीय साम्राज्याखाली होता. त्यावेळी या भागांवर दिल्लीतून राज्य केले जात होते. भारतीय सैनिकांच्या देखरेखीखाली हे भाग भारताचा भाग मानले जात होते. अरबी द्वीपकल्पाचा एक तृतीयांश भाग ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा भाग होता. एडन ते कुवेत पर्यंत, हे भाग दिल्लीत बसलेल्या व्हाइसरॉयच्या अधीन होते. या प्रातांचा कारभार हा भारतीय राजकीय सेवेद्वारे चालवला जात असे. त्यावेळी येमेनमधील एडनसारख्या भागात भारतीय पासपोर्ट जारी केले जात होते. एडन हे मुंबई प्रांताचा भाग म्हणून पाहिले जात असे. ते भारताचे सर्वात पश्चिमेकडील बंदर होते.
ब्रिटिश भारताच्या नकाशांमध्ये आखाती प्रदेशांचा समावेश होता, परंतु ते गुप्त ठेवण्यात आले होते. ऑट्टोमन किंवा सौदी राजवटींना द्वेष येऊ नये म्हणून ते सार्वजनिक कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आले नव्हते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे एक सुनियोजित पाऊल उचलले होते. अबू धाबी सारख्या आखाती प्रदेशांना जयपूर सारख्या भारतीय संस्थानांसारखे वागवले जात असे. व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी ओमानलाही बलुचिस्तान सारखे संस्थान बनवावे असे सुचवले. यावरून असे दिसून येते की आखाताला भारताचा भाग मानण्याचा विचार किती खोलवरचा होता.
1931 मध्ये महात्मा गांधी जेव्हा एडनला भेट दिली तेव्हा अनेक अरब तरुण त्यांना भारतीय राष्ट्रवादी म्हणून भेटले. यावरून असे दिसून येते की आखाती देशातील लोक भारताशी जोडलेले होते. त्यावेळी ब्रिटिश जनतेलाही या नात्याची पूर्ण जाणीव नव्हती. 1920 च्या दशकात भारतीय राष्ट्रवाद वाढू लागला आणि आखात भारताचा भाग आहे ही कल्पना कमकुवत झाली. 1 एप्रिल 1937 रोजी, एडन भारतापासून वेगळे झाले आणि ब्रिटिश वसाहतवादी साम्राज्याचा भाग बनले. ही आखाताच्या अलिप्ततेची सुरुवात होती.
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, 1 एप्रिल 1947 रोजी दुबई, कुवेत सारखे आखाती प्रदेश औपचारिकपणे भारतापासून वेगळे झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आखाताची जबाबदारी भारत किंवा पाकिस्तानला देणे योग्य ठरणार नाही. त्यानंतर हे भाग लंडनच्या अखत्यारीत आले. 1971 पर्यंत आखाती देशांमध्ये भारतीय रुपया अधिकृत चलन म्हणून वापरला जात होता. ब्रिटिश इंडिया शिपिंग लाइन ही आखाती देशांमध्ये वाहतुकीचे मुख्य साधन होती. आखाती देशातील 30 संस्थाने भारतीय वंशाच्या ब्रिटिश रहिवाशांकडून चालवली जात होती.
1971 मध्ये, ब्रिटनने आखातातील आपल्या वसाहतवादी जबाबदाऱ्या सोडल्या. ब्रिटिश साम्राज्याच्या पतनाचा हा शेवटचा टप्पा होता. यानंतर, आखाती देशांनी त्यांच्या इतिहासातून ब्रिटिश भारताशी असलेले संबंध जवळजवळ पुसून टाकले. आज दुबई हा मध्यपूर्वेतील वेगाने विकसीत होणारा प्रांत आहे. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की ते एकेकाळी ब्रिटिश भारताचा भाग होते. लाखो भारतीय आणि पाकिस्तानी लोक तिथे राहतात, परंतु हे ऐतिहासिक नाते आता फक्त पुस्तकांमध्येच आहे. हा प्रशासकीय निर्णय इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे.