Space News : अवकाश, अंतराळ, ग्रह-तारे यासंदर्भातील अनेक निरीक्षणं सातत्यानं सुरू असून संशोधक दर निरीक्षणाच्या माध्यमातून काही नवे खुलासे करत असतात. त्यातच आता नव्या अहवालाची भर पडली असून, त्या माध्यमातून चंद्र आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या नात्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इकारसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निरीक्षणपर अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कोणत्याही क्षणी पृथ्वीभोवती चंद्राचे 6 तुकडे परिक्रमा करू शकतात. यांचा आकार
एका लहानशा कारइतका असून, चंद्राची एखाद्या मोठ्या गोष्टीशी टक्कर होऊन त्यातून हे तुकडे तयार होतात. ही गोष्ट सहसा उल्कापिंड असू शकते. अशा भयंकर घटनांनंतर काही तुकडे सुर्याच्या कक्षेत जातात, तर काही तुकडे मात्र पृथ्वीच्या कक्षेत येऊन गुरुत्वाकर्षणाच्या समीकरणामुळं तिथंच अडकून पडतात.
हवाई युनिवर्सिटीतील संशोधक आणि या निरीक्षणाचं नेतृत्त्वं करणाऱ्या मुख्य लेखक रॉबर्ट जेडिक यांनी या लघुचंद्र अर्थात मिनीमूनची तुलना एका नृत्याशी केली आहे. स्पेस डॉट कॉमला दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितल्यानुसार हा 'स्क्वेअर डान्स' असून, तिथं सातत्यानं जोडीदार मात्र बदलत असतात. यापूर्वी अधिक मिनीमून एस्ट्रॉईड बेल्टमधून येतात असं ग्राह्य धरलं जात होतं. मात्र नव्या निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार मिनीमून जवळपास 9 महिने पृथ्वीभोवती परिक्रमा करून त्यानंतर ते अवकाशात विलीन होतात.
प्रत्यक्षात पृथ्वीभोवती असे कैक लघुचंद्र असले तरीही त्यांना हेरणं मात्र संशोधकांपुढचं आव्हान होतं. दुर्बिणीच्या माध्यमातूनही त्यांना पाहणं कठीणच. त्यांच्या परिभ्रमणाचा अतिप्रटंड वेग अनेकदा अभ्यासकांनाही चकवा देऊन जातो. भविष्याच्या दृष्टीनं या लघुचंद्रांचा विचार करायचा झाल्यास त्यांची बरीच मदत होणार आहे. काही वेळासाठी ते पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर अंतराळातील सखोल निरीक्षणासाठी मोठी मदत करतात. त्यामुळं आता या निरीक्षणातून आणखी कोणती रंजक माहिती पुढे येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.