SpaceX Starship crash: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्कनं (Elon Musk) आतापर्यंत बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या अवकाश क्षेत्रापासूनही तो दूर राहिलेला नाही. उलटपक्षी या क्षेत्रात त्यानं आणखीच स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली असून, भविष्याच्या दृष्टीनं तो अनेक बेत आखताना दिसत आहे. इथं एलॉन मस्क या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी भांडवल आणि इतर सर्व मदत देण्यासाठी सढळ हस्ते महदत करत असतानाच दुसरीकडे मात्र त्याच्या स्वप्नांच्या बंगल्याला हादरा बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
गुरुवारी एका चाचणी उड्डाणादरम्यान मस्कच्या स्पेसएक्सचं स्टारशिप रॉकेट संपर्क तुटल्यामुळं नियंत्रणाबाहेर गेलं आणि क्षणार्धात या रॉकेटनं पेट घेतला. लाँच झाल्याच्या काही क्षणांनंतरच या रॉकेटमध्ये तांत्रित बिघाड होऊन संपर्क तुटल्यानं पुढच्याच क्षणाला रॉकेटचं इंजिनही बंद झालं. रॉकेटनं पेट घेतला आणि आकाशातच रॉकेटच्या चिंधड्या होऊन पेट घेतलेले तुकडे आगीच्या गोळ्याप्रमाणं प्रचंड वेगानं दक्षिण फ्लोरिया आणि बहामासच्या आकाशातून जमिनीच्या दिशेनं कोसळताना गिसले.
रॉकेटच्या चाचणीचं थेट प्रक्षेपण आणि सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्यानं संशोधकांसह मस्क यांच्यासाठीसुद्धा हा एक मोठा धक्काच ठरला. गुरुवारी टेक्सस येथून मस्क यांच्या स्पेसएक्सच्या या रॉकेटनं उड्डाण भरलं. अवकाशात जाऊन तिथं बनावट उपग्रह सोडून पुन्हा पृथ्वीवर उतरण्याचं लक्ष्य या रॉकेटसाठी निर्धारित करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या रॉकेटनं अपेक्षित कामगिरी केली. पण, त्यानंतर मात्र त्याच्यावरील नियंत्रण गमावल्यानं या रॉकेटशी असणारा संपर्क तुटला आणि ही दुर्घटना घडली.
चाचणीदरम्यानच्या या दुर्घटनेसंदर्भात स्पेसएक्सनं अधिकृत माहिती जारी करत स्टारशिप रॅपिड अनशेड्यूल्ड डिसअसेम्बली म्हणजेच अनपेक्षित अपघाताच्या उल्लेखासह या अपघातावर शिक्कामोर्तब केलं. या रॉकेटला झालेली दुर्घटना इतक्या गंभीर स्वरुपातील होती की, अमेरिकी फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन FAA नं मियामी, फोर्ट लॉडरडेल, पाम बीचसह ऑरलँडो विमानतळांवर काही काळासाठी उड्डाणं पूर्णपणे थांबवण्यात आली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं.
मस्क यांच्याच कंपनीकडून एक यान अवकाशात असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर माघारी आणण्यासाठी पाठवण्यात येण्याची तयारी सुरू असतानाच इथं स्टारशिप रॉकेटची दुर्घटना होणं ही भविष्यातील काही मोहिमांना पोहोचलेली हानी असल्याचं म्हटलं जात आहे. या मोहिमेवर अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासानंही करडी नजर ठेवली होती. सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात चंद्रावर अवकाशयात्रींना पाठवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार होता. चाचणी सत्रात स्टारशिपचं हे आठवं उड्डाण असून, यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्याची चाचणी घेण्यात आली होती. जिथं उड्डाणानंतर काही क्षणांत हे रॉकेट दुर्घटनाग्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता संपूर्ण समीक्षण करत मस्क यांची ही संस्था रॉकेटमध्ये बदल करण्यावर भर देत असून त्यांच्या पुढील चाचणीवरच लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.