Donald Trump US Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्कासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर जगभरात टॅरिफ (Tariff War) चीच चर्चा पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर थेट परिणाम करणाऱ्या या निर्णयाविरोधात आता अनेक देशांनी विरोधी सूर आळवत त्याच धर्तीवर ठाम भूमिका घेण्यासही सुरुवात केली आहे.
सध्याच्या घडीला 27 देशांचा सहभाग असणाऱ्या युरोपीय आयोगानं ट्रम्प यांच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेत सोमवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ज्यानुसार अमेरिकी बनावटीच्या काही सामानांवर 25 टक्के आयात शुल्क आकारणार असल्याचं स्पष्ट केलं. 16 मे पासून हा नवा नियम लागू होणार असल्याची माहिती अधिकृत कागपत्रांतून समोर आल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं.
हिरे, अंडी, डेंटल फ्लॉस, पोल्ट्री यासोबतच इतरही काही गोष्टींवर वाढीव आयातशुल्क आकारलं जाणार आहे. बदाम आणि सोयाबीनवरील कर डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार असून आता ट्रम्प यांच्या भूमकेला अनेक राष्ट्र खुलं आवाहन देताना दिसत आहेत.
अमेरिकेकडून चीनवरही सर्वाधिक आयात शुल्क लावलं जात असतानाच आता चीननं जाहीरपणे ट्रम्प सरकारविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. इथं ट्रम्प यांनी चीनला आव्हान देत त्यांनी अमेरिकेवर लावण्यात आलेली आयात शुल्काची अट शिथील केली नाही, तर त्यांच्यावर वाढीव 50 टक्क्यांचं आयात शुल्क लागू करण्याचा इशारा दिला, तर, तिथं चीनकडून आपण कोणत्याही प्रकारच्या दबावतंत्रापुढं झुकणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आपला देश व्यापार युद्धासाठी सज्ज असल्याचं सांगत अमेरिकेनं कितीही प्रयत्न केले तरीही त्यांच्यापुढं चीन मात्र माघार घेणार नसल्याचच या आशियाई देशाकडून सांगण्यात आलं.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते लिन जिआन यांनी जाहीर वक्तव्य करताना आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देत संरक्षणवाद आणि आर्थिक दादागिरीचं हे उदाहरण असल्याचं त्यांनी बोचऱ्या शब्दांत सांगितलं.