Why Bangladeshis Attacking Bata, Pizza Hut, KFC Outlets: बांगलादेशमध्ये दिवसोंदिवस परिस्थिती चिघळत चालली आहे. मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारने देशातील अनेक प्रश्नांकडे कानाडोळा केल्याची जगभरात चर्चा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवरील हल्ल्यांनंतर आता जहाल बांगलादेशींनी अनेक अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दुकानांवर हल्ले सुरु केले आहेत. जहाल मतवादी बांगलादेशी तरुणांनी आता चप्पल आणि बूट विकणाऱ्या जगप्रसिद्ध 'बाटा' ब्रॅण्डबरोबरच 'पिझ्झा हट' आणि 'केएफसी'च्या आऊटलेटवर हल्ले करुन तेथील खाण्याच्या तसेच वापराच्या वस्तूंवर डल्ला मारला आहे. मात्र या परदेशी ब्रॅण्ड्सवर अचानक बांलगादेशी तरुण हल्ले का करु लागलेत हे अनेकांना ठाऊक नाही त्याबद्दलच जाणून घेऊयात...
गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्याविरोधात बांगलादेशमध्ये परदेशी ब्रॅण्ड्सला लक्ष्य केलं जात आहे. या ब्रॅण्ड्सवर बहिष्कार टाकण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक परदेशी ब्रॅण्ड्सचं कथित इस्रायल कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. बुधवारी झालेल्या विरोध प्रदर्शनामध्ये अनेक शहरांमध्ये आंदोलन हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक परदेशी कंपन्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तसेच या दुकानांची तोडफोड करुन त्यामधून सामान आंदोलनकर्त्यांना पळवलं
मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारने या हल्ल्यांना निषेध केला असला तरी या हल्ल्यांना सरकारचीच फूस असल्याचं चर्चा आहे. शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर बांगलादेशमधील स्थिती मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारच्या नेतृत्वाखाली दिवसोंदिवस अधिक भयानक होत चालली आहे. भारताचीही बांगलादेशमधील घडामोडींवर बारीक नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारला बांगलादेशमधील परिस्थितीवरुन सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र या सल्ल्यानंतर काही दिवसांमध्येच आता परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे प्रकार भारताचा शेजारी असलेल्या देशात घडत आहेत.
बांगलादेशमधील आवामी लीगने या हल्ल्यांसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, "हे केवळ राजकीय संकट नाही. ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावरुन यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही तर बांगलादेश पुढील अफगाणिस्तान होईल," अशी भीती व्यक्त केली आहे. पक्षाने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यासाठी मोहम्मद यूनुस यांचे हंगामी सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारताबरोबर मागील काही महिन्यांपासून बांगलादेशचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. शेख हसिना यांना सत्तेतून खाली खेचल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी केलेली काही विधाने ही भारतविरोधी असल्याचं मानलं जात आहे. ईशान्य भारताला उल्लेख लॅण्डलॉक असा करुन युनूस यांनी त्यांची चीनबरोबरची जवळीक वाढल्याचं अधोरेखित केलं असून यामुळे भारताची चिंता वाढली आहे. व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांलगादेशसारखा शेजारी खदखदत राहणे भारतासाठी धोक्याचं ठरु शकतं.
बांगलादेशमधील आऊटलेटची तोडफोड झाल्यानंतर 'बाटा'ने अधिकृत पत्रक जारी केलं आहे. यामध्ये, "आम्हाला त्या खोट्या दाव्यांची कल्पना आहे ज्यामध्ये बाटा ही इस्रायलचा मालकी हक्क असणारी कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कंपनीचा इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षाशी संबंध असल्याचा दावाही चुकीचा आहे. बाटा ही खासगी कंपनी असून तिचा संपूर्ण मालकी हक्क कुटुंबाकडे आहे. बाटाची स्थापना झेक प्रजासत्ताक या देशात झाली आहे. याचा संघर्ष आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्या काही दुकानांची तोडफोड करण्यात आली हे फारच संतापजनक आहे. जे काही घडलं ते खोट्या दाव्यांमुळे घडलं," असं कंपनीने म्हटलं आहे.