Israel Iran War 14000 Kg Bomb: संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिल्ल्या इस्रायल-इराणदरम्यानचा संघर्ष संपण्याऐवजी अधिक चिघळत चालला आहे. मंगळवारीही दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्बहल्ले केल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने तेहरानमधील सरकारच्या मालकीच्या इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्रं डागली. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार ते इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दिलेली ताजी माहिती इस्रायलची चिंता वाढणारी आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अण्विक केंद्रांना जास्त नुकसान झाले नाही, असं आयएईएने एका निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणला अधिक वेगाने अण्विक शस्त्रे बनवण्यास प्रेरणा मिळू शकते अशी भीती आता इस्रायलच्या अयशस्वी हल्ल्यांनंतर व्यक्त केली जात आहे.
इराणी अण्विक केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं जास्त नुकसान न झाल्यामुळे इस्रायल आपल्याच कामगिरीवर नाराज आहे. अशा परिस्थितीत, त्यांनी इराणी अण्विक केंद्रांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेकडून जीबीयू-57A/B (GBU-57A/B) मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बंकर बस्टर बॉम्बची मागणी केली आहे. अर्थात ही केवळ मागणी असून अमेरिकेने अद्याप इस्रायलला हा बॉम्ब देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर हा बॉम्ब इस्रायलच्या हातात पडला तर तो इराणमध्ये नक्कीच विनाश घडवू शकतो. जर इस्रायलने या बॉम्बने इराणमधील अण्विक केंद्रांना लक्ष्य केले तर इराणमध्ये अण्विक किरणोत्सर्ग पसरू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इराणमध्ये न्यूक्लिअर रेडिएशनचा धोका निर्माण होईल. हा असा धोका सामान्य लोकांसाठी घातक ठरू शकतो, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
जीबीयू-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर नावाच्या अनोख्या बॉम्बेची रचना विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीनेच केली आहे. अमेरिकी हवाई दलाच्या मदतीने हा बॉम्ब तयार करण्यात आला आहे. हा अमेरिकन हवाई दलाचा सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब असल्याचे सांगितले जाते. जीपीएसच्या मदतीने टार्गेटचा वेध घेणारा हा बॉम्ब खास जमिनीखाली असणारे शत्रूचे बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या खास बॉम्बच्या डिझाइनवर सन 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच काम सुरू झालं होतं. सुरुवातीला, नॉर्थ्रोप ग्रुमन आणि लॉकहीड मार्टिन यांनी एक संयुक्त उपक्रमाअंतर्गत या बॉम्बसंदर्भात काम केलं. मात्र नंतर आर्थिक अडचणी आणि तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी हा प्रकल्प अर्ध्यात सोडून दिला.
2003 मध्ये अमेरिकेने सद्दाम हुसैन यांची हुकूमशाही नष्ट करण्याच्या इराद्याने इराकवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेला पुन्हा या बंकर बस्टर बॉम्ब निर्मितीच्या प्रकल्पात नव्याने हुरुप आला. अमेरिकी लष्कराचे त्यावेळी वापरले जाणारा बंकर नष्ट करणारे बॉम्ब अपेक्षेनुसार कामगिरी करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अर्ध्यात सोडलेल्या या प्रकल्पाकडून अमेरिकेला पुन्हा आशा निर्माण झाली. डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सी (डीटीआरए) अंतर्गत हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. 'डीटीआरए'ने एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरीसोबत संयुक्तपणे काम करत 2004 साली या बॉम्बसंदर्भातील चाचण्या सुरु केल्या. जीबीयू-57A/B ची पहिली नियंत्रित स्फोट चाचणी 2007 मध्ये करण्यात आली. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स मिसाईल रेंजमध्ये या बॉम्बची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, बोईंगने या बॉम्बला विमानामध्ये इंटीग्रेट करण्याचं टेंडर मिळवलं होतं. 2008 ते 2010 पर्यंत, B-52 आणि B-2 बॉम्बरमधून वारंवार हा बॉम्ब टाकण्यात आलेला. 2011 मध्ये, हा प्रकल्प अमेरिकन हवाई दलाकडे सोपवण्यात आला.
जीबीयू-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर बॉम्बचे वजन सुमारे 14 हजार किलोग्रॅम इतकं आहे. म्हणजेच या बॉम्बचे एकूण वजन एकत्रितपणे दोन आफ्रिकन हत्तींच्या वजनाइतके आहे. हा बॉम्ब सुमारे 20.5 फूट लांबीचा आहे. या बॉम्बचा व्यास 31.5 इंच आहे. या बॉम्बचे वॉरहेड एएफएक्स-757 आणि पीबीएक्सएन-114 स्फोटकांच्या मिश्रणाचे वजन सुमारे अडीच हजार किलोग्रॅम इतके आहे. ही सर्व रचना एका विशेष उच्च-कार्यक्षमता असलेल्या स्टील मिश्रधातूपासून बनलेली आहे. बॉम्बच्या क्षमतेबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की एमओपी 200 फूट काँक्रीटमध्ये हा बॉम्ब सहज प्रवेश करू शकतो. इतरांचे म्हणणे आहे की ते 5 हजार पीएसआयएमच्या ताकदीसह सुमारे 60 मीटर कडक काँक्रीट, तसेच 40 मीटर कठीण खडकात शिरु शकतो. 10 हजार पीएसआयएम ताकदीसह आठ मीटर कडक काँक्रीटमध्ये हा बॉम्ब सहज प्रवेश करून नुकसान घडवण्याची क्षमता असलेला आहे.