World News : यंदाच्या वर्षी उकाडा फेब्रुवारीपासूनच सुरू झाला असून, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती नेमकी किती भीषण असेल या विचारानंही अनेकांनाच घाम फुटला. कधी एकदा पाऊस सुरू होतो याचीच वाट प्रत्येकजण पाहताना दिसला. इथं प्रारंभीचाच उकाडा सहन होत नसल्यामुळं ही तऱ्हा असताना, ज्या ठिकाणी कधीच पाऊस पडला नाही तिथं काय स्थिती असेल विचार तरी केला आहे का?
प्रत्यक्षात असं एक गाव अस्तित्वात असून, तिथं कधीच पाऊस पडत नाही. येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला असणारं हे एक गाव. पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं हे गाव पावसाअभावीसुद्धा इतकं सुंदर आहे की पाहणारे अवाक् होतात. इथं असणाऱ्या पर्वतरांगांवर इतकी सुरेख घरं आहेत की पाहणाऱ्यांचीही नजर इथच खिळून राहते.
भूपृष्ठापासून 3200 मीटर इतक्या अंतरावर हे गाव स्थित असून, या गावाच्या चारही बाजूंना असणारं वातावरण अतीव उष्ण आहे. एकिकडे या अल हुतैब गावात अतिप्रचंड उकाडा असतानाच इथं असणारा गारठासुद्धा तितकाच बोचरा असतो. सूर्योदयानंतर मात्र इथं एका क्षणात वातावरणबदल होत असून, तापमानवाढीचा सामना स्थानिकां ना करावा लागतो.
ग्रामीण आणि शहरी आधुनिकीकरणाचा कमाल संगम या गावात पाहायला मिळतो. प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना या गावात पाहायला मिळत असून, इथं 'अल-बोहरा आणि अल-मुकरमा' समुदायाची मोठी वस्ती इथं आढळते. याच समुदायाला यमनी समुदाय असंही संबोधतात.
यमनी समुदायातील लोक हे मुहम्मद बुरहानुद्दीनच्या नेतृत्तावातील इस्माइली (मुस्लिम) संप्रदायाचे अनुयायी असून, त्यांचं वास्तव्य मुंबईत होतं असं इतिहास सांगतो.
एखाद्या ठिकाणचं वातावरण हे त्या ठिकाणाच्या भौगोलिक रचनेमुळं अस्तित्वात येतं आणि हे गावसुद्धा इथं अपवाद नाही. मुळातच हे गाव इतक्या उंचावर आहे, की त्यांची उंची सांगताना ते ढगांच्याही वर असल्याचं सांगण्यात येतं. थोडक्यात या गावाच्या तळाशीच ढग तयार होऊन तिथं नैसर्गिक क्रियेतून पाऊस पडतो. मात्र मूळ गावात मात्र पाऊस कधीच पडत नाही. आहे की नाही काहीशी अनपेक्षित पण तितकीच कमाल गोष्ट?