Marathi News> विश्व
Advertisement

विमानाच्या टेक ऑफ- लँडिंगवेळी एअरहॉस्टेस खिडक्या बंद का ठेवू देत नाही? कधी विचार केलाय?

Airplane Window shades: विमानानं प्रवास करत असताना इथुन पुढे खिडकी पाहिली तर, तुम्हालाही आठवेल ही माहिती... जाणून घ्या असं नेमकं काय केलं जातं...

विमानाच्या टेक ऑफ- लँडिंगवेळी एअरहॉस्टेस खिडक्या बंद का ठेवू देत नाही? कधी विचार केलाय?

Airplane Window shades: विमानानं प्रवास करताना सहसा अनेक मंडळींना खिडकीपाशी बसायला आवडतं. विमानाच्या खिडकीतून डोकावलं असता विमान हवेत असताना खाली अगदी इवलंसं दिसणारं जग ही मंडळी कौतुकानं पाहत असतात. विमान प्रवास कितीदाही केलेला असो, जेव्हाजेव्हा खिडकीपाशी बसण्याची संधी मिळते तेव्हातेव्हा हा प्रवास अगदी खास असतो.

विमान प्रवासादरम्यानच प्रवास सुरू झाल्यानंतर काही सूचना फ्लाईट अटेंडंट किंवा एअरहॉस्टेस देतात. यामध्ये खिडकीसंदर्भातील सूचनांचाही समावेश असतो. विमान आकाशात झेपावताना कोणत्याही प्रवाशानं खिडकी बंद करू नये असं इथं स्पष्ट सूचित केलं जातं. विमान लँड करतानाही हाच नियम लागू असतो. पण, असं नेमकं का? माहितीये?

जाणकारांच्या माहितीनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव फ्लाईट अटेंडंटकडून विमानाच्या उड्डाण प्रक्रियेदरम्यान महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये खिडकीवर असणारा पडदा न टाकण्यासा सल्ला दिला जातो. एविएशन ट्रेनिंग इंडियाचे संस्थापक कर्नल राजगोपालन यांच्या माहितीनुसार असं करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षितता.

विमानाच्या टेक ऑफ किंवा लँडिंग प्रक्रियेमध्ये कोणतंही संकट ओढावल्यास खिडक्या उघड्या ठेवल्यानं तुमच्या डोळांना विमानाबाहेरी सूर्यप्रकाश किंवा अंधाराचा आधीपासूनच अंदाज असेल आणि इथं प्रवाशांना अधिक वेगानं प्रसंगाला तोंड देत कृती करता येईल. आजुबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत त्याच्याशी एकरुप होण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्वाची असते.

एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मागील 20 वर्षांमध्ये बहुतांश दुर्घटना आणि विमान अपघात हे टेकऑफ किंवा लँडिंगच्याच वेळी झाले. हे दोन्ही टप्पे उड्डाणातील अतिशय महत्त्वाचे टप्पे असून, इथं हवामानापासून ते अगदी आजुबाजूच्या परिसरापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात.

हेसुद्धा वाचा : मनाजोग्या घराच्या शोधात वणवण फिरणाऱ्यांसाठी MHADA ची फायदेशीर ऑफर; नोंदणीसुद्धा सुरू...

विमानाच्या खिडक्या किंवा ब्लाईंड्स उघड्या ठेवण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे विमानाचे बाह्यरंग. विमानाचं इंजिन किंवा त्याच्या पंखांमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास चालक दलाला याची माहिती त्या लहानशा खिडक्यांमुळं मिळते. याशिवाय आपात्कालीन परिस्थितीमध्ये विमानातून उतरायचं झाल्यास विमानाचा कोणता भाग यासाठी सुरक्षित आहे हेसुद्धा याच खिडक्याच्या मदतीनं पाहता येतं. त्यामुळं किमान उड्डावेळी आणि लँडिंगवेळी विमानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्याच गेल्या पाहिजेत.

Read More