Marathi News> विश्व
Advertisement

Israel Iran War : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी; अमेरिकेकडून हवाई हल्ले करत इराणची आण्विक तळं उद्ध्वस्त

"सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर टाकण्यात आले होते." 

Israel Iran War : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी; अमेरिकेकडून हवाई हल्ले करत इराणची आण्विक तळं उद्ध्वस्त

Israel Iran War : इराण-इस्रायलमध्ये चांगलंच युद्ध पेटलंय. दरम्यान या युद्धाच्या मैदानात आता अमेरिकेनं देखील उडी घेतलीय. अमेरिकेनं इस्त्रायलला साथ देत इराणवर मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकेनं हवाई हल्ले करत इराणची आण्विक तळं उद्ध्वस्त केलीय.

इराण आणि इस्रायल संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण इस्रायलला पाठिंबा देणा-या महासत्ता अमेरिकेनं आता युद्धाच्या मैदानात उडी मारलीये. आतापर्यंत इराणला हल्ल्यांची धमकी देणा-या अमेरिकेनं इराणवर जोरदार हल्ला चढवलाय. इराणमधील 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आलाय. फोर्डो, नतांज, इस्पाहान ही अणुकेंद्र अमेरिकेनं उद्ध्वस्त केलीयेत. त्या ठिकाणी अणू प्रकल्प सुरु होता त्याच ठिकाणांना अमेरिकेनं लक्ष्य केलं. 

इराणने अणुकार्यक्रम रद्द न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं दिला होता. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका ठळकपणे सांगितलीये.

अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्स विमानाने इराणमधील फोर्डो आण्विक स्थळ नष्ट केलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण गुडघ्यावर येईल असं इस्रायलला वाटत असतानाच इराणने इस्रायलवर जोरदार हवाई हल्ला केलाय. 

इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा शहरावर इराणने 40 क्षेपणास्र डागली आहेत. अवघ्या काही तासात इराणने केलेला हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा मानला जातोय. इस्रायलमध्ये 15 शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला असून आणीबाणी लागू करण्यात आलीये. 

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेनं उडी घेणं ही तिस-या महायुद्धाची नांदी मानली जातेय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर  इराणला पाठिंबा देणा-या चीन आणि रशियाच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष लागलंय. मित्र देश इराणच्या मदतीसाठी चीन आणि रशिया पुढे येतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर टाकण्यात आले होते." त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक ही केले आणि म्हणाले, "आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही." यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, आता शांततेचा काळ आहे. किंबहुना, या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या दोन देशातील तणावात आता अमेरिकेनेही उडी घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे.  

अमेरिकेच्या एअर स्ट्राईकनंतर येमेनमधील हुथी बंडखोरांनी अमेरिकेकडे हल्ले थांबवण्याची मागणी केलीये. हल्ले थांबवले नाहीत तर अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिलाय.

इराणवरील हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेकडून सावधगिरी बाळगण्यात येतेय. अमेरिकेनं पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे अमेरिकेनं सुरू केलेला हा संघर्ष कुठवर जाणार?, इराण एक पाऊल मागे घेणार? की अमेरिकेला जशाच तस उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. 

Read More