Afghanistan On Israel-Iran War: इराण विरुद्ध इस्रायल युद्धामुळे जगातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे. अमेरिका, रशिया या बड्या देशांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानातील तालिबाननेही या युद्धाबाबत मोठं विधान केलं आहे. तालिबानने इस्रायलला जोरदार विरोध केला आहे. तसेच इस्लामिक देशांना सूचक संदेश दिला आहे. तालिबानकडून युद्ध थांबवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
इस्रायल-इराण युद्धादरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी ओआयसीच्या सदस्य देशांना इस्रायलकडून पॅलेस्टाईन आणि इराणवर होत असलेला अत्याचार थांबवण्याचे आवाहन करतो. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर इतर देशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होईल याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात," अशी भिती आमिर खान मुत्तकी यांनी व्यक्त केली आहे.
आमिर खान मुत्तकी यांनी मुस्लिम देशांना संदेश दिला आहे. "ओआयसीची ही शिखर परिषद केवळ संकटाची चिंता करण्यासाठी नसावी, तर ती व्यावहारिक कामे, सर्व देशांची एकत्रित भूमिका आणि नवीन उपाय शोधण्यासाठी असावी. जर इस्लामिक देशांनी मजबूत राजकीय इच्छाशक्ती, इस्लामिक बंधुता आणि परस्पर सहकार्याने काम केले तर याचा जागतिक निर्णय घेणाऱ्या देशांवरही प्रभाव पडेल," असं आमिर खान मुत्तकी यांनी म्हटलं आहे.
महत्वाची बाब म्हणजे, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे तालिबानला जागतिक व्यासपीठावर संधी मिळत नाही. त्याचबरोबर या देशाला आंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्जही मिळत नाही. पाश्चात्य देशांनी तालिबानवर महिलांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या सरकारता मान्यता मिळालेली नाही. मात्र तालिबानचे नेते मुस्लिम देशांच्या व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करु शकतात.
अमेरिकेने इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो अणूकेंद्रांवर बी-2 बॉम्बरने हल्ला केला होता. हा हल्ला इराणच्या आण्विक स्थळावर करण्यात आला होता अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. आमचा हेतू इराणने अणुबॉम्ब बनवू नये असा आहे असंही अमेरिकेने म्हटलं होतं. मात्र त्यानंतर इराणने अमेरिकेच्या सिरियातील तळावर हल्ला केला होता अशी माहिती समोर आली आहे. रात्री उशीरा इराणने कतारमधील अमेरिकी तळांना लक्ष्य केलं.