Job News : जगाच्या पाठीवर अशा अनेक कंपन्या आहेत जिथं कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं काही असे नियम आखून दिले जातात की, अनेकदा हे नियम कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा काहीसे अनपेक्षितच असतात. असाच एक नियम चीनमधील एका कंपनीनं लागू केला आहे. हा नियम कर्मचाऱ्यांना धक्काच देत आहे, कारण त्याचं पालन न झाल्यास कर्मचारी नोकरी गमावूही शकतात.
चीनच्या शादोंग प्रांतात असणाऱ्या एका कंपनीनं अविवाहित आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लग्न करण्याचे आदेश दिले आहेत. असं न केल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येईल. साऊथ चायना मॉर्निंग पॉईंटच्या माहितीनुसार शादोंग शांटियन केमिकल ग्रुप कंपनी लिमिटेडनं 1200 हून अधिक कर्मचाऱ्यांना अनुसरून हा आदेश जारी केला आहे. जिथं कर्मचाऱ्यांनी चांगलं काम करुन गृहस्थाश्रमाला प्राधान्यही द्यावं असं म्हटलं गेलं आहे.
सप्टेंबर महिन्याचा अल्टीमेटम इथं देण्यात आला असून, त्यातही काही टप्पे असून, मार्च महिनाअखेरपर्यंत स्वत:वर टीका करणारं पत्र लिहावं लागेल. जूनच्या अखेरपर्यंत लग्न न झाल्यास कंपनी त्यांचं मूल्यांकन करेल आणि सप्टेंबरच्या अखेरपर्यंत लग्न न झाल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येईल. परिश्रम, दयाळूपणा, निष्ठा, धार्मिकता यांसारख्या भावना आणि सांस्कृतीक मुल्यांना प्राधान्य देणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर ज्यावेळी चीनमधील या कंपनीच्या आदेशावरून मतमतांतरं येण्यास सुरुवात झाली तेव्हा कंपनीनं या आदेशामध्ये सुधारणा करत नवे आदेश जारी करत आपण याआधी दिलेला आदेश रोखण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
चीनमधील कोणा एका कंपनीनं असा अनपेक्षित नियम आखण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा कर्मचाऱ्यांना धक्का देणारे कैक नियम कंपन्यांनी आखत कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंमलबजावणीच्या सूचनाही केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातटच या आणखी एका नियमाची भर.