उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत किम जोंग उन भावूक झाल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर भावूक होऊन तो चक्क रडू लागला होता. देशातील जन्मदर घसरत असल्याने चिंता व्यक्त करताना त्याने महिलांना जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत किम जोंग उन खाली पाहताना आणि डोळे पुसताना दिसत आहे.
"जन्मदरातील घट रोखणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे ही आमची सर्व कुटुंबासंबंधी कर्तव्यं आहेत जी आम्ही मातांसोबत काम करताना हाताळली पाहिजेत," असं किम जोंग उनने रविवारी प्योंगयांगमधील मातांसाठी आयोजित कार्यक्रमात म्हटल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. यावेळी त्याने राष्ट्रीय शक्ती मजबूत करण्यात मोलाची भूमिका निभावल्याबद्दल मातांचे आभार मानले.
Kim Jong Un CRIES while telling North Korean women to have more babies.
— Oli London (@OliLondonTV) December 5, 2023
The dictator shed tears while speaking at the National Mothers Meeting as he urged women to boost the countries birth rate. pic.twitter.com/J354CyVnln
"जेव्हा कधी मला पक्ष आणि देशाची कामं करताना फार अडचण येते तेव्हा मी नेहमी मातांचा विचार करतो," असं किम जोंग उन यावेळी म्हणाला.
उत्तर कोरियात गेल्या काही दशकात जन्मदरात मोठी घसरण झाली आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अंदाजे 2023 पर्यंत प्रजनन दर किंवा एका महिलेला जन्माला येणा-या मुलांची सरासरी संख्या उत्तर कोरियामध्ये 1.8 होती. अलीकडील काही दशकांमध्ये झालेली ही मोठी घसरण आहे. उत्तर कोरियाच्या शेजारील राष्ट्रांमध्ये समान परिस्थिती असतानाही प्रजनन दर जास्त आहे. दक्षिण कोरियाचा प्रजनन दर गेल्या वर्षी विक्रमी नीचांकी 0.78 पर्यंत खाली आला होता, तर जपानचा आकडा 1.26 पर्यंत घसरला.
दक्षिण कोरियातील घटत्या जन्मदरामुळे बालरोगतज्ञांची कमतरता निर्माण झाली आहे, तर एक शहर जन्मदर वाढवण्यासाठी मॅचमेकिंग इव्हेंट आयोजित करत आहे.
सुमारे 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियाला अलीकडच्या दशकात गंभीर अन्नटंचाईचा सामना करावा लागला आहे. अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे हे संकट निर्माण होतं. ज्यामध्ये 1990 च्या दशकातील प्राणघातक दुष्काळाचा समावेश आहे.