Marathi News> विश्व
Advertisement

लडाख सीमा वाद : चिनी ड्रॅगन घाबरला, अखेर नमते घ्यावे लागले!

चिनी आगळिकीला भारतानेही जशास तसे उत्तर दिल्यावर अखेर चिनी ड्रॅगनला नमते घ्यावे लागले आहे. 

लडाख सीमा वाद : चिनी ड्रॅगन घाबरला, अखेर नमते घ्यावे लागले!

नवी दिल्ली : चिनी आगळिकीला भारतानेही जशास तसे उत्तर दिल्यावर अखेर चिनी ड्रॅगनला नमते घ्यावे लागले आहे. भारताचा गजराज आणि चीनचा ड्रॅगन यांना एकत्र नृत्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे करणेच दोन्ही देशांच्या जनतेकरिता हितावह आहे, असे वक्तव्य चिनी राजदूत सन वाईडाँग यांनी केले आहे. काल चीनच्या परराष्ट्र खात्यानेही भारत चीन यांच्यातली स्थिती ही स्थिर आणि नियंत्रण ठेवता येण्याजोगी आहे, असे म्हटले होते. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन वाद निर्माण झाला आहे.

चीनने पुन्हा भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या कोरोनावरुन तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. अमेरिकेने चीनला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे चीन जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी लडाख सीमावादाकडे लक्ष केंद्रीत केल्याचे म्हटले आहे. चीनने अचानक लडाख येथे सैन्याचे जमवाजमव केली. त्यामुळे भारतानेही या स्थितीवर बारीक लक्ष ठेवले.

त्यादृष्टीने भारतानेही तयारी सुरु केली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलविली. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल, सीडीएस बिपिन रावत आणि तीन सैन्य प्रमुख उपस्थित होते. यानंतर मोदींनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशीही चर्चा केली. याआधी संरक्षणमंत्र्यांनी सीडीएस आणि तीन सैन्याच्या प्रमुखांशी लडाखमधील तणावाबाबत सुमारे एक तास बैठक घेतली होती.

भारताने तातडीची बैठक घेत चीनला इशारा दिला.  राजनाथ यांना चीनच्या कुरावतीवर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराची माहिती दिली. या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय म्हणजे या भागात रस्त्याचे बांधकाम सुरु राहील. तर चीन सैनिकांइतकचे भारतीय सैनिक तैनात राहतील, असा दुसरा निर्णय करण्यात आला. त्यानंतर चीनकडून अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आली आहे. चिनी राजदूत सन वाईडाँग यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चीनने आता एक पाऊल मागे घेत तनाव निवळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

काय आहे हा वाद?

भारत-चीन बॉर्डरवर डोकलाम परिसरात दोन्ही देशांमध्ये २०१७ मध्ये १६ जून ते २८ ऑगस्टपर्यंत वाद सुरू होता. त्यामुळे, दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. यानंतर झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी आप-आपले सैनिक मागे घेण्यास सहमती दिली होती. भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये रस्ते बांधणाऱ्या चिनी सैनिकांना अडवले होते. त्यावरुन दोन्ही देशांच्या सैनिकांत डोकलाम वादाची सुरुवात झाली होती. चीनने हे बांधकाम आपल्याच मालकीच्या हद्दीत सुरु असल्याचा दावा केला होता. मात्र, हा भारताचा भाग आहे.

 

Read More