Employees Live Location: मलेशियातील एका महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिला जो अनुभव आला तो कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या महिलेनुसार, तिच्या कंपनीत नव्याने एक नियम लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना रजेवर असतानाही कंपनीला आपले लाईव्ह लोकेशन शेअर करणे बंधनकारक करण्यात आलं.
कोणताही कर्मचारी आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करत नसेल, तर त्यांनी आधीच रजा घेतलेली असली तरीही त्यांना 'अनुपस्थित' मानलं असा आदेश देण्यात आला. या महिलेने सांगितले की, जोपर्यंत कर्मचारी त्यांचे ठिकाण शेअर करत नाही, तोपर्यंत त्याची रजा मान्य केली जात नाही, असा नवीन नियम कंपनीने लागू केला.
10 जून रोजी या महिलेने तिच्या अनुभवाबाबत एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, ती सुट्टीसाठी मलेशियातील एका बेटावर गेली असतानाही तिचे लाईव्ह लोकेशन बॉसने मागितले. तिने नाही बोलल्यानंतर बॉस सतत लोकेशनसाठी कॉल करत त्याला मानसिक त्रास देत होता. या त्रासनंतर तिला प्रश्न पडला की 'मी काय गुलाम आहे का?' अखेरीस तिने समुद्रकिनाऱ्याचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'मला खूप राग आला होता, म्हणूनच मी ठिकाणाचं नाव इथे दिलं नाही.'
तिच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, 'हे काही सामान्य नाही, तुमच्या बॉसची मानसिकता चुकीची आहे.' दुसऱ्या नेटकरी म्हणाला, 'तुमच्या गोपनीयतेचे असे उल्लंघन कसे होऊ शकतं? सुट्टी म्हणजे वैयक्तिक वेळ असतो.'
काही लोकांनी मत मांडलं की, जर कंपनीने सुट्टीचा खर्च उचलला असता तर कदाचित अशी मागणी योग्य ठरली असती. मात्र, वैयक्तिक खर्चाने गेलेल्या सुट्टीत लोकेशन मागणे हे कर्मचाऱ्याच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे.
अनेक नेटकऱ्यांनी तिला अशी कंपनी सोडून इतर चांगली नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. याशिवाय, पगारी रजा आणि आजारी रजा घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही लोकेशन मागितल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं की, जर पुन्हा असं घडलं तर ती मलेशियाच्या कामगार विभागाकडे तक्रार करेल. मलेशियाच्या कामगार कायद्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून किमान 8 दिवसांची पगारी रजा मिळावी, असा नियम आहे.