Marathi News> विश्व
Advertisement

कमकुवत पासवर्डमुळे बुडाली 158 वर्षे जुनी कंपनी, 700 कर्मचाऱ्यांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या, तुम्हीपण करता ही चूक?

Weak Password: हा सायबर हल्ला एका कर्मचाऱ्याच्या कमकुवत पासवर्डमुळे घडला. 

कमकुवत पासवर्डमुळे बुडाली 158 वर्षे जुनी कंपनी, 700 कर्मचाऱ्यांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या, तुम्हीपण करता ही चूक?

Weak Password: आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशाच एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ब्रिटनमधील 158 वर्षे जुनी वाहतूक कंपनी, केएनपी लॉजिस्टिक्स, एका सायबर हल्ल्यामुळे कायमस्वरूपी बंद पडली. या हल्ल्याने कंपनीचा संपूर्ण डेटा नष्ट झाला आणि सुमारे 700 कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

कमकुवत पासवर्ड ठरला संकटाचे कारण

मीडिया अहवालानुसार, हा सायबर हल्ला एका कर्मचाऱ्याच्या कमकुवत पासवर्डमुळे घडला. हॅकर्सनी या कमकुवत पासवर्डचा फायदा घेत कंपनीच्या आयटी सिस्टममध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी कंपनीचा डेटा एन्क्रिप्ट केला आणि संपूर्ण सिस्टम लॉक केली. या हल्ल्यामागे अकिरा रॅन्समवेअर टोळी असल्याचा संशय आहे.

हॅकर्सकडून खंडणीची मागणी

या सुरक्षेच्या त्रुटीचे मुख्य कारण कमकुवत पासवर्ड होता, असे कंपनीचे संचालक पॉल अ‍ॅबॉट यांनी सांगितले. मात्र त्यांनी त्या कर्मचाऱ्याची ओळख उघड केली नाही. सायबर हल्ल्यानंतर हॅकर्सनी कंपनीकडून डेटा डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात खंडणी मागितली. त्यांनी एका मेसेजमध्ये लिहिले, 'जर तुम्ही हे वाचत असाल, तर तुमच्या कंपनीची अंतर्गत प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. भावनांना आवर घाला आणि आमच्याशी संपर्क साधा'. 

53 कोटींची खंडणी

अहवालानुसार, हॅकर्सनी सुमारे 5 दशलक्ष पौंड (अंदाजे 53 कोटी रुपये) खंडणीची मागणी केली. मात्र, कंपनीकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. परिणामी हॅकर्सनी कंपनीचा सर्व डेटा कायमस्वरूपी नष्ट केला. यामुळे कंपनीला आपले कामकाज बंद करावे लागले आणि ती कायमची बंद पडली.

कमकुवत पासवर्डचा धोका

ही घटना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर इशारा आहे. जर तुम्ही अजूनही 1,2,3,4,5 सारखे साधे आणि कमकुवत पासवर्ड वापरत असाल, तर सावध व्हा. एका छोट्या चुकीमुळे केवळ तुमचे वैयक्तिक नुकसानच नाही, तर संपूर्ण कंपनी आणि त्यातील कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आणू शकता. 

सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी जटिल पासवर्ड वापरणे आणि नियमितपणे त्यात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेने सायबर सुरक्षेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. प्रत्येक व्यक्ती आणि कंपनीने आपली डिजिटल सुरक्षा गांभीर्याने घेण्याची वेळ आलीय.

Read More