Marathi News> विश्व
Advertisement

India Pakistan War: पाकिस्तान विजयी झाल्याचा शहबाज यांचा दावा! म्हणाले, 'भारताने मशि‍दींवर...'

Pakistan PM Shahbaz Sharif Address To Nation: रात्री साडेअकराच्या सुमारास पाकिस्तानला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधानांनी अनेक बिनबुडाची विधानं केली.

India Pakistan War: पाकिस्तान विजयी झाल्याचा शहबाज यांचा दावा! म्हणाले, 'भारताने मशि‍दींवर...'

Shahbaz Sharif Address To Nation: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेजवळील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न भारतीय संरक्षण यंत्रणांकडून हाणून पाडले जात आहेत. 10 मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये शस्रसंधीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने शस्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा हल्ले सुरु केला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रात्री साडेअकरा वाजता पाकिस्तानमधील नागरिकांना संबोधित केलं. या भाषणामध्ये शरीफ यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केले. शरीफ यांनी भारतानेच पाकिस्तानवर युद्ध लादल्याचा हास्यास्पद दावा आपल्या भाषणात केला.

या देशांचे मानले आभार

प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्रसंधीच्या निर्णयासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून चीन, सौदी अरेबिया, तुर्किए, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि अन्य प्रभावशाली व्यक्तींसहीत सहकारी देशांचे आभार मानले. भारताने शस्रसंधीसंदर्भात भाष्य करताना केवळ भारत आणि पाकिस्तानमध्येच याबद्दल चर्चा झाल्यानंतर शस्रसंधीचा निर्णय झालेला, असं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. या ठिकाणीही शहबाज यांनी भारताच्या भूमिकेविरोधातच भूमिका घेतल्याचं दिसून आलं. 

आपला विजय झाल्याची घोषणा

युद्धात अधिक नुकसान होईल या भीतीने भारताला फोन करुन यु्द्धबंदीची मागणी करण्याचा पाकिस्तानने चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्याप्रमाणे या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचं जाहीर केलं. शहबाज शरीफ यांनी, "हा आपल्या धोरणांचा आणि सन्मानाचा विजय आहे. एखाद्या समजूतदार देशाकडून शत्रूला जशी वागणूक दिली पाहिजे तेच आम्ही केलं. हा केवळ संरक्षण दलांचा नाही तर देशातील सर्व 24 कोटी नागरिकांचा विजय आहे," असं शाहबाद शरीफ म्हणाले. शहबाज यांनी खोटा दावा करताना भारताच्या राफेल विमानांना पाकिस्तानच्या हवाई दलाने टार्गेट केलं आणि त्यांचा हल्ला परतवून लावल्याची बतावणी केली. 

भारताबद्दल नको ती विधानं

शहबाज शरीफ यांनी लष्करी तळ आणि पाणी साठ्यांजवळ भारताने हल्ला केल्याचा दावा केला. "आम्ही शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देण्याचं ठरवलं आहे. आता जे काही टेबलवर बसून बैठक होणार होती ती गाठभेट आता केवळ युद्धाच्या मैदानात होईल," अशा शब्दांमध्ये शहबाज शरीफ यांनी फुशारक्या मारल्या. 

बिनबुडाचे दावे

शाहबाज शरीफ यांनी बिनबुडाचे आरोप करताना, "आपल्या अहंराकारमध्ये बुडालेल्या भारताने कारण नसताना आपली (पाकिस्तानची) क्षेत्रीय अखंडता आणि संप्रभुताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाईल्सच्या माध्यमातून निर्दोष लोकांना, मशि‍दींना आणि नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांनी आपल्या धैर्याची परीक्षा घेतली," असा दावा केला. मात्र भारतीय सेनेने यापूर्वी केवळ दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत असं स्पष्ट केलं आहे. शहबाज शरीफ यांनी 12 मिनिटांच्या भाषणात युद्धासंदर्भात वाटेल ते दावे आणि खोटी माहिती दिली. 

Read More