पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताला धमकी देताना कडवं सत्यही सांगून टाकलं. आसिम मुनीर यांनी भारताची तुलना चकाकणाऱ्या मर्सिडीज कारशी केली आहे, जी हायवेवर वेगाने धावत आहे. मात्र यावेळी त्यांनी पाकिस्तानला भंगारने भरलेला ट्रक म्हटलं. त्यांनी भारताला धमकी देताना दोन्ही गाड्यांची धडक झाल्यास कोणाचं नुकसान जास्त होईल? अशी विचारणा केली.
आसिम मुनीर यांनी अमेरिका दौऱ्यात हे विधान केलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत जोरदार कारवाई केल्यानंतर आसिम मुनीर यांनी भारताविरोधातील संताप व्यक्त केला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी यावेळी जर पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट आलं तर आम्ही अर्धे जग सोबत घेऊन बुडू अशी पोकळ धमकीही दिली आहे.
एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेतून तिसऱ्या देशाला अण्वस्त्र धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर उपस्थितांना म्हणाले, "आम्ही एक अणुशक्तीसंपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटलं की आम्ही खाली जात आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ".
आसिम मुनीर यांनी भारताची तुलना हायवेवर धावणाऱ्या मर्सिडीजशी आणि पाकिस्तानची दगडं भरलेल्या डंप ट्रकशी केली. "भारत हायवेवर चमकणारी मर्सिडीज आहे, जी हायवेवर फरारीप्रमाणे धावत आहे. पण आम्ही खडी भरलेला डंप ट्रक आहोत. जर ट्रकने कारला धडक दिली, तर कोणाचं नुकसान होईल?," अशी विचारणा त्यांनी उपहासात्मकपणे केली आहे.
मुनीर यांनी दावा केला आहे की, "भारत स्वत:ला एखाद्या विश्वगुरुच्या रुपात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण वास्तविकपणे ते यापासून फार दूर आहेत". त्यांनी कॅनडामध्ये एका शीख नेत्याची हत्या, कतारमध्ये आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरणाचा उल्लेख केला. घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादात भारताच्या कथित सहभागाचे "अनेक पुरावे" आहेत असा दावाही त्यांनी केला.
भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुनीर यांनी सिंधू नदीवरील नियंत्रणावरून भारतावर निशाणा साधला. "आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू," असं ते म्हणाले आहेत. "सिंधू नदी ही भारतीयांची कुटुंबाची मालमत्ता नाही.. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह," असे मुनीर यांनी म्हटल्याचं 'द प्रिंटने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.
FAQ
1) असिम मुनीर यांनी अमेरिकेत कोणती धमकी दिली आहे?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारताविरुद्ध अण्वस्त्र धमकी दिली. त्यांनी सांगितले की, जर पाकिस्तानला भारताकडून अस्तित्वाचा धोका जाणवला, तर “आम्ही अर्धे जग आमच्यासोबत नष्ट करू.”
2) असिम मुनीर यांनी सिंधू नदीबाबत काय म्हटले?
मुनीर यांनी भारताने सिंधू नदी करार स्थगित केल्याचा उल्लेख करत सांगितले की, यामुळे २५ कोटी लोकांना उपासमारीचा धोका आहे. त्यांनी धमकी दिली की, “जर भारताने बांध बांधला, तर आम्ही दहा क्षेपणास्त्रांनी तो नष्ट करू.” त्यांनी पुढे म्हटले, “सिंधू नदी ही भारतीयांची खाजगी मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह.”
3) असिम मुनीर यांनी भारताविरुद्ध आणखी कोणते आरोप केले?
मुनीर यांनी कॅनडातील शीख नेत्याची हत्या, कतारमधील आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरणाचा उल्लेख करत भारतावर आंतरराष्ट्रीय दहशतवादात सहभाग असल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की हे “निर्विवाद पुरावे” आहेत