Gold And Copper Reserves Found In Pakistan : भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानात ट्रिलियन डॉलर्सचा खजिना सापडला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल रिसोर्सेस लिमिटेड (एनआरएल) ने बलुचिस्तानच्या चगाई जिल्ह्यात सोने आणि तांब्याचे साठे सापडल्याची माहिती दिली आहे. मागील 18 महिन्यांत 500 चौरस किलोमीटर क्षेत्राचा शोध घेत 16 संभाव्य खनिज साठे शोधले आहेत. त्यात प्रामुख्याने सोने आणि तांब्याचे साठे आहेत. लवकरच येथे खाणकाम सुरू केले जाणार असल्याचे एनआरएलने म्हटले आहे . बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारे खनिजे सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या भागात खनिजांचे मोठे साठे आहेत.
पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज साठे सापडतात. आता देखील सोनं आणि तांब्याची मोठी खाण सापडली आहे. या प्रदेशात धातू आणि अधातू दोन्ही प्रकारची खनिजे आढळतात. गेल्या काही वर्षांत येथे खाणकाम वाढले आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष बलुचिस्तानवर आहे. बलुचिस्तानमध्ये तांबे, सोने, लोखंड, क्रोमाईट, कोळसा, संगमरवरी, गोमेद, बॅराइट, अँटीमनी, शिसे, जस्त आणि मॉलिब्डेनम अशी खनिजे आहेत. त्यांची एकूण किंमत ट्रिलियन डॉलर्समध्ये असल्याचा अंदाज आहे.
बलुचिस्तानमधील रेको डिक हा जगातील सर्वात मोठ्या तांबे-सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे. हे चगाई जिल्ह्यात आहे. येथे 5.9 अब्ज टन धातूचा साठा असल्याचा अंदाज आहे. त्यात प्रति टन सरासरी 0.41 टक्के % तांबे आणि 0.22 ग्रॅम सोने असते. नव्याने सापडलेल्या साठ्यांमध्ये सुमारे 11.66 दशलक्ष टन तांबे आणि 660 टन सोने आहे. रेको डिकची किंमत 500 अब्ज डॉलर्स ते 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत असल्याचा अंदाज आहे.
चागाईमध्ये सैनाक नावाची आणखी एक महत्त्वाची तांबे-सोन्याची खाण आहे. येथे सुमारे 412 दशलक्ष टन साठा आहे. त्यात 1.69 दशलक्ष टन धातू हा उत्खनन करण्या योग्य आहे. यातून दरवर्षी अंदाजे 15,800 टन तांबे, 1.47 टन सोने आणि 2.76 टन चांदीचे उत्पादन होते.
बलुचिस्तानमध्ये लोहखनिजाचेही मोठे साठे आहेत. हे विशेषतः चगाई, लसबेला आणि चिलगझीमध्ये आहे. येथे 20 कोटी टन लोहखनिज असू शकते. त्याची गुणवत्ता वेगवेगळी आहे. चिलगझीमध्ये सर्वाधिक उच्च दर्जाचे लोह साठे आहेत. याची किंमत अंदाजे 10-20 अब्ज डॉलर्स आहे.