Marathi News> विश्व
Advertisement

'पुन्हा पाकिस्तानचं विभाजन होऊन नवा देश जन्माला येणार'; पाकिस्तानी पंतप्रधानांना इशारा

Pakistan Will Be Devided: पाकिस्तानची यापूर्वी 1971 साली फाळणी झाली असून त्यामधून बांगलादेशची निर्मिती झाली आहे. मूळ पाकिस्तानची निर्मितीही भारतापासून झालेल्या फळणीमधूनच झाली आहे.

'पुन्हा पाकिस्तानचं विभाजन होऊन नवा देश जन्माला येणार'; पाकिस्तानी पंतप्रधानांना इशारा

Pakistan Will Be Devided: पाकिस्तानमध्ये मागील काही काळापासून स्थानिकांच्या मनात सरकारविरोधात मोठी खदखद पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसामध्ये दिवसोंदिवस असंतोष वाढत चालला आहे. पाकिस्तानच्या इतर प्रांतांमधील लोकांकडूनही केवळ पंजाब प्रांताकडे देशाचं प्रतिनिधित्व सोपावलं जातं आणि इतर प्रातांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप अनेकदा होतो. याचसंदर्भातील पाकिस्तानचे खासदार आणि जमीयत उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष फजल उर-रहमान यांनी पाकिस्तान सरकारला देशाच्या फाळणीचा इशारा दिला आङे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये आपलं म्हणणं मांडताना फजल उर-रहमान यांनी, "पुन्हा पाकिस्तानचं विभाजन होऊन एक नवा देश तयार होणार," असं म्हटलं आहे.

नव्या देशाची निर्मिती होणार

उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष फजल उर-रहमान यांनी हे विधान करताना, "बलूचिस्तान आणि खबैर पख्तूनखवासहीत अनेक प्रांत आहेत. हे प्रांत कोणत्याही क्षणी आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा करु शकतात. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संयुक्त राष्ट्र यासंदर्भातील घोषणा करु शकतात," अशी शक्यता व्यक्त केली आहे. फजल उर-रहमानने पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना इशारा दिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर देशात 1971 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही या खासदाराने व्यक्त केली. ज्या पद्धतीने पूर्व पाकिस्तान आपल्या देशापासून वेगळा झाला आणि त्यामधून बांगलादेशची निर्मिती झाली त्याचप्रमाणे पुन्हा एक देश पाकिस्तानमधून निर्माण होऊ शकतो, असं फजल उर-रहमान यांनी म्हटलं आहे.

नुसते कायदे करता पण...

फजल उर-रहमान यांनी सरकारला, "तुम्ही केवळ एकामागून एक कायदे तयार करत आहात. मात्र जनता तुम्हाला स्वीकारताना दिसत नाहीये. आधी जनतेला तुमच्या ताब्यात घ्या. फुटीरतावाद्यांच्या परिसरामध्ये पोलिसही नाहीत आणि लष्कराचे सैनिकही नाही अशी स्थिती आहे. त्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते," असा इशारा दिला आहे. मानवी तस्करीविरोधातील कायदा संमत करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या चर्चेदरम्यान फजल उर-रहमान यांनी ही विधानं केली आहेत.

भारताविरुद्ध पराभव आणि बांगलादेशची निर्मिती

ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारताची फाळणी होऊन 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र त्यावेळी बंगाल प्रांतातील काही भाग पूर्व पाकिस्तान म्हणून जाहीर करण्यात आलेला. मात्र 20 वर्षांहून अधिक काळ या भाग हिंसाचारामध्ये धगधगत राहिल्यानंतर 1971 साली भारताविरुद्ध झालेल्या युद्धानंतर पाकिस्तानने तह करुन पूर्व पाकिस्तानवरील ताबा सोडल्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. याच फाळणीचा संदर्भ आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संसदेमध्ये देण्यात आला आहे.

Read More