Pakistan PM Shehbaz Sharif Video: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध मागील महिन्याभरापासून कमालीचे तणावपूर्ण असल्याने शाहबाज शरीफ यांचं नाव बरंच चर्चेत आहे. देशातील युद्धजन्य परिस्थितीदरम्यान 73 वर्षीय शाहबाज शरीफ यांनी केलेली अनेक विधानं पाकिस्तानची पोलखोल करणारी ठरली आहेत. भारताने 7 मे रोजी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ला केल्याची माहिती शरीफ यांनीच आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिल्यानंतर पुढील काही आठवड्यांमध्ये त्यांनी केलेल्या हास्यास्पद आणि स्वत:च्याच देशाची पोलखोल करणारी विधानं इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली. असं असतानाच आता त्यांचा एक नको तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहबाज शरीफ हे फार शरीफ नाहीत असा टोला लगावला आहे.
शाहबाज शरीफ यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा 2023 सालातील आहे. या व्हिडीओमध्ये शाहबाज शरीफ हे एका पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सदर कार्यक्रम हा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पंजाबच्या राज्यपाल भवनामध्ये पार पडला होता. या व्हिडीओत शाहबाज शरीफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जात असल्याचं दिसत आहे. मात्र याच दरम्यान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला न शोभणारी एक गोष्ट केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हा जुना व्हिडीओ आता पाकिस्तानमधील 'यू न्यूज टीव्ही'ने त्यांच्या युट्यूब चॅनेलवरही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला संबंधित चॅनेलने, "शाहबाज शरीफ पुरस्कार प्रदान करताना मावरा होकेनला निरखून पाहत असताना... वा व्हिडीओ व्हायरल झालाय," अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल मावरा होकेन हिला शाहबाज शरीफ पुरस्कार प्रदान करताना दिसत आहेत. अभिनेत्री मंचावर येऊन शाहबाज शरीफ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते. त्यानंतर पुढे निघून जाते. मात्र ही अभिनेत्री पाठ वळवून पुढे निघून जात असतानाच शाहबाज शरीफ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निरखून पाहताना दिसत आहेत. "शरीफ हे फारसे शरीफ नाहीत" अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ...
Apparently Shehbaz Sharif is not that Sharif pic.twitter.com/RzzitJgJlI
— Cabinet Minister, Ministry of Memes, (@memenist_) May 28, 2025
अशाप्रकारे नामांकित व्यक्तींनी अभिनेत्रींकडे चुकीच्या अर्थाने पाहण्याचे प्रकार अनेकदा कॅमेरात कैद झाले आहेत. आता शाहबाज शरीफ यांचा हा व्हिडीओ अशाच अर्थाने व्हायरल होतोय ज्यामध्ये कशाप्रकारे पुरुष महिलांकडे त्यांना ऑब्जेक्टीफाय केल्याप्रमाणे पाहतात हे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मावरा होकेनने 'समन तेरी कसम' (2016) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकत्याच भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर 'समन तेरी कसम'मध्ये मावरासोबत झळकलेला भारतीय अभिनेता हर्षवर्धन राणे याने पुन्हा तिच्यासोबत आपण या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याच इच्छूक नसल्याचं जाहीर केलं आहे.
शाहबाज शरीफ हे वयाच्या 72 व्या वर्षी 2024 साली मार्च महिन्यात दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या आघाडीचं सरकार चालवतात. 336 सदस्य असलेल्या पाकिस्तानी संसदेच्या सभागृहात शरीफ नेतृत्व करत असलेल्या आघाडी सरकारला 201 सदस्यांचा पाठिंबा आहे.