Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये रेल्वे हायजॅक प्रकरणानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं असून, इथं दहशतवादी/ बलूच आर्मी संघटनेच्या माणसांनी ही रेल्वे हायजॅक केल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास 182 प्रवाशांना ओलीस ठेवत आपल्यावर कोणतीही लष्करी कारवाई केल्यास या प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी बलूक आर्मीनं दिली आहे.
बलूच लिब्रेशन आर्मी या संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार क्वेटा इथून पेशावरच्या दिशेनं जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला बोलन इथं हायजॅक करण्यात आलं. मुळात बीएलएनं पाकिस्तानात क्रूर कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर, यापूर्वीसुद्धा या संघटनेनं पाकिस्तानात अनेक जीवघेणे हल्ले केले आहेत.
बलूच लिब्रेशन आर्मी ही पाकिस्तानमधील एक विद्रोही आणि सशस्त्र फुटीरतावादी संघटना आहे. गेल्या कैक वर्षांपासून ही संघटना बलूचिस्तानमध्ये सक्रिय असून अफगाणिस्तानशेजारीच असणाऱ्या या प्रांतातील नागरिकांना पुरेशा संसाधनांचा लाभ घेता येत नाही अशी त्यांची अनके वर्षांपासूनची मागणी. बलुचिस्तानाचं स्वातंत्र्य आणि तिथं असणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर सर्वतोपरि स्थानिकांचाच अधिकार प्रस्थापिक करण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
बलूच लिब्रेशन आर्मी ही एक दहशतवादी संघटना म्हणून गणली जात असून, पाकिस्ताननं 2006 पासून या संघटनेला दहशतवादी गट म्हणून घोषित केलं होतं. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी या संघटनेकडून सातत्यानं पाकिस्तानी लष्कर, सरकारी प्रतिष्ठानांवर जीवघेणे हल्ले करण्यात येतात. या संघटनेशिवाय इथं बलूच रिपब्लिकन आर्मी, लष्कर ए बलुचिस्तान यांसारखे गटही सक्रिय असून त्यांच्याकडूनही वेगळ्या बलुचिस्तानची मागणी जोर धरताना दिसू लागली आहे.
1947 मध्ये जेव्हा पाकिस्तान हे राष्ट्र घोषित करण्यात आलं तेव्हा बलुचिस्तान एक स्वतंत्र संस्थान होतं. मात्र 1948 मध्ये पाकिस्ताननं या प्रांतालाही देशात समाविष्ट करून घेतलं. त्या क्षणापासून बलुचिस्तानातील नागरिक राजकीय आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा लढा देत असल्याचं म्हटलं गेलं आहे. 1970 च्या दशकामध्ये बलूच नाकरिकांकडून सातत्यानं पाकिस्तानपासून विभक्त होण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, 1970 मध्ये पाकिस्तानच्या वतीनं एक मोठं लष्करी अभियान हाती घेत बलूच नेते आणि तेथील स्थानिक समुदायांना अवमानिक करण्यात आलं ज्यानंतर कैक बलूच संघटनांनी इथं सशस्त्र लढा देण्याची हाक दिली आणि त्या क्षणापासून बलूचिस्तानही धुमसू लागलं.