Protest Wearing Sanitary Pads On Mouth: लोकशाही मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचं सर्वात सोप आणि प्रभावी माध्यम म्हणजे आंदोलन! लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा, आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. मात्र हा अधिकार मर्यादित स्वरुपात असतो. देशाची सुरक्षेला बाधा पोहोचणार नाही, सामाजिक समतोल बिघडणार नाही, कोणाच्याही भावना दुखावणार नाही असं आंदोलन करण्यास कोणाची काहीही हरकत नसते. मात्र आंदोलनाची चर्चा व्हावी म्हणून हल्ली वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन हटके पद्धतीने आंदोलन करण्याचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. अशाच एका हटके आंदोलनामुळे सध्या आशियामधील एका देशात नवा वाद निर्माण झाला आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
हा सारा प्रकार मलेशियामध्ये घडला आहे. येथे अलिकडेच झालेल्या एका राजकीय निषेधाची देशभरात चर्चा आहे. निषेध करण्याची पद्धत पाहून देशभरामध्ये संताप निर्माण झाला आहे. महिलांच्या आरोग्यासंर्भात असलेल्या रुढी परंपरावादी गोष्टींविरोधात एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. रविवारी नेगेरी सेम्बिलन येथे डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टी (डीएपी) च्या सदस्यांनी आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह प्रकार घडला.
राज्य सिनेटर म्हणून 'बाहेरील' व्यक्तीची नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीच्या सदस्यांनी तोंडावर सॅनिटरी पॅड लावले होते. निदर्शकांनी सिनेटरच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी हे अनोखं आंदोलन केलं. निवृत्त स्थानिक प्रतिनिधीच्या जागी जोहोरमधील सिनेटरची नियुक्ती करण्यास आंदोलांनी विरोध केला. "जाड, दाट, अत्यंत शोषक आणि ध्वनीरोधक" असलेले हे पॅड राज्य पक्ष समितीच्या 'हवाही जाणार नाही इतकं तोंड दाबून ठेवण्याचं' प्रतीक आहे असं आंदोलकांनी पॅड्स वापरण्यामागील तर्काबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.
तथापि, या निषेधाच्या युक्तीवर डीएपीमधूनच तीव्र टीका झाल्याचं दिसत आहे. मलेशियामध्ये मासिक पाळीसंदर्भातील गैरसमज या असल्या प्रकारामुळे आणखी वाढू शकतील असा इशारा पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांनी दिला आहे.
डीएपीच्या क्वालालंपूर महिला आघाडीने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये महिला आघाडीने, "मासिक पाळीचा पॅड वैयक्तिक फायद्यासाठी किंवा अंतर्गत निषेधाचं साधन नाही," असं स्पष्ट केलं आहे. यावर भर दिला की मासिक पाळीचे पॅड लाखो महिलांच्या जीवनातील वेदनादायी अनुभवांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर राजकीय वक्तव्यांसाठी करू नये, असं डीएपीच्या महिला आघाडीने म्हटलं आहे.
ऑल वुमेन्स अॅक्शन सोसायटीने देखील या स्टंटचा निषेध केला आहे. "हे सारं निरर्थक आणि मागासलेल्या विचारसणीचं आहे," असं ऑल वुमेन्स अॅक्शन सोसायटीने म्हटलं आहे.