World News : जगाच्या पाठीवर काही देश सातत्यानं चर्चेचा विषय ठरत असून, त्यातलंच एक नाव आहे रशिया. युक्रेनसोबत सुरु असणारं युद्ध, या युद्धा झालेली मनुष्य आणि वित्तहानी आणि एकंदरच देशापुढं असणाऱ्या न संपणाऱ्या समस्या पाहता आता याच देशानं शालेय विद्यार्थिनींना अनुसरून एक अजब घोषणा केली.
मध्य रशियाच्या ओर्योल प्रांतात ही घोषणा करण्यात आली असून, मुलं जन्माला घालणाऱ्या विद्यार्थिनींना शासनाकडूनच आर्थिक मदत केली जाणार असल्याचं सांगितलं. हा रशियातील त्या 40 भागांपैकी एक प्रांत असून इथं महिला विश्वविद्यालयातील विद्यार्थिनींना मातृत्त्वासाठी किमान 100000 रूबल (जवळपास 1200 डॉलर) दिले जातात.
7x7 या वृत्तसंस्थेनुसार या शासकीय फर्मानामध्ये शालेय विद्यार्थिनींनासुद्धा आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली असून, स्थानिक गव्हर्नर आंद्रेई क्लिचकोव यांनी याबाबतची घोषणा केली.
युद्ध आणि त्यानंतरच्या काळापासून रशियामध्ये मोठ्या प्रमाणात जन्मदर घटला आणि देशापुढं एक नवं संकट उभं राहिलं. मागील 25 वर्षांमध्ये देशातील जन्मदरानं निच्चांक गाठला असून, मृत्यूदरात मात्र अतिशय झपाट्यानं वाढ झाली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात मृत्यूदरात आणखी भर पडली असून खुद्द राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीसुद्धा जेशातील जन्मदर वाढीच्या मुद्द्यावर भर दिला आहे. ज्याअंतर्गत देशात तीन किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या कुटुंबांना आदर्श कुटुंब म्हणत देशात हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे सातत्यानं पुतीन सरकार नागरिकांना लक्षात आणून देत आहे.
देशातील महिलांनी कमीत कमी तीनहून अधिक मुलांना जन्म द्यावा, ज्यामुळं रशियाच्या उज्वल भवितव्यासाठी मदत मिळेल असं सांगत या महिलांना देशातील सरकारच्या वतीनं आर्थिक मदसुद्धा दिली जाणार असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान अधिकृत आकड्य़ांवर लक्ष दिल्यास 2024 मधील सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये रशियामध्ये जवळपास 599,600 मुलांचा जन्म झाला. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत हा आकडा 16,000 नं कमी होता. या तुलनेत 49,0000 इतके मृत्यू नोंदवण्यात आले. एकिकडे घटणारा जन्मदर आणि दुसरीकडे झपाट्यानं वाढणारा मृत्यूदर यांमुळं रशिया सध्या एका वेगळ्या संकटाशी दोन हात करताना दिसत आहे, ज्या कारणास्तव या देशात विविध मार्गांनी विविध प्रांतात जन्मदर वाढीसाठीचे पर्याय अवलंबले जात आहेत.